पिंपरी : चाकणजवळील आगरवाडी येथील एका शेतकऱ्याने मक्याच्या शेतात गांजाची ६६ झाडे लावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चाकण पोलिसांनी कारवाई करत ११ लाख ५० हजार रुपये किमतीचा २३ किलो गांजा जप्त केला. सदाशिव आप्पासाहेब देशमुख (वय ६५, रा. आगरवाडी रोड, चाकण) असे गांजाचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
हेही वाचा >>> आदित्य ठाकरे यांचा हल्लाबोल : म्हणाले, ‘अटकेच्या भीतीनेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ४० गद्दार भाजपसोबत..’
फौजदार नामदेव तलवाडे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चाकण पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक प्रसन्न जऱ्हाड यांना आगरवाडी रोडवर एका शेतकऱ्याने आपल्या शेतात गांजा लावला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, चाकण पोलिसांनी चाकण-काळूस रोडवर असलेल्या देशमुख यांच्या शेतात जाऊन खात्री केली. त्यावेळी मक्याच्या शेतात मोठ्या प्रमाणात गांजाची झाडे आढळून आली. आठ ते दहा फूट उंचीची ६६ झाडे पोलिसांना मिळाली. या झाडांचे वजन २३ किलो होते. तर, किंमत ११ लाख ५० हजार रुपये आहे. पोलिसांनी गांजाची झाडे जप्त करत देशमुख याला अटक केली आहे.