लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इंदापूर: पोलीस भरतीची तयारी करत असलेल्या अवघ्या २२ वर्षीय शेतकरी तरुणावर शेतामध्ये अंगावर वीज पडल्याने काळाने घाला घातला. वादळी पावसाचे वातावरण असताना काटी (ता. इंदापूर) येथे मंगळवारी (७ मार्च) ही दुर्घटना घडली.

ओंकार दादाराम मोहिते असे या दुर्दैवी घटनेमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या शेतकरी पुत्राचे नाव आहे. कामानिमित्त आपल्या शेतामध्ये ओंकार गेला होता. याच दरम्यान सायंकाळी वादळी पावसाचे वातावरण झाले होते. शेतामध्ये असतानाच त्याच्या अंगावर वीज पडली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या ओंकार याला तातडीने इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

आणखी वाचा- पुणे: मेहनत घेत असतानाच मल्लाचे निधन

काटी येथील मोहिते वस्ती येथे राहणारे दादाराम महादेव मोहिते यांना ओंकार हा मुलगा आणि दोन मुली आहेत. ओंकार हा पोलीस भरतीची तयारी करत वडिलांना शेती कामात मदत करीत असे. शांत, मनमिळाऊ, संयमी आणि कर्तव्यदक्ष युवक अशी त्याची परिसरात ओळख होती. त्याच्या अकाली निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. यासंदर्भात तुकाराम भिवा मोहिते यांनी यांनी इंदापूर पोलिसात खबर दिली. इंदापूर तहसीलचे निवासी नायब तहसीलदार अनिल ठोंबरे, काटीचे मंडल अधिकारी मल्लाप्पा ढाणे, तलाठी महेश मेटे यांनी पंचनामा केला. ओंकारच्या शेतापासून जवळच्या अंतरावर असलेल्या एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये वीज पडल्याने नारळाचे झाड जळाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmer young man dies due to lightning fall on him pune print news vvk 10 mrj