शेतक-यांच्या प्रश्नांसाठी झटणारे नेते शरद जोशी यांचे वयाच्या ८१व्या वर्षी निधन झाले. पुण्यातील राहत्या घरी त्यांनी सकाळी ९ वाजता अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवासांपासून त्यांची प्रकृती खालावली होती.
शेतकऱयांच्या प्रश्नावर लढणारे झुंझार नेते म्हणून शरद जोशी यांची ओळख होती. ३ सप्टेंबर १९३५ रोजी सातारा येथे जन्म झालेल्या शरदरावांचे प्राथमिक शिक्षण बेळगावला झाले तर मुंबईतील सिडनहॅम कॉलेजमधून त्यांनी एमकॉम केले. बँकिंग या विषयासाठी त्यांना सी. रँडी सुवर्णपदकाने गौरवण्यात आले. १९७९ मध्ये त्यांनी शेतकरी संघटनेची स्थापना केली आणि तेव्हापासून ‘शेतमालास रास्त भाव’ या एककलमी कार्यक्रमासाठी कांदा,उस, तंबाखू, दूध, भात, कापूस, इत्यादी पिकांच्या शेतकरी आंदोलनाचे नेत्वृत्व केले. शरद जोशींचे सर्वात मोठे यश म्हणजे ‘शेतकरी तितका एक एक’ हा नारा देऊन त्यांनी शेतकरी समाजाला जात, धर्म, प्रांत, भाषा हे भेद विसरायला शिकवलं होतं. १९८० साली नाशकात कांदा आणि ऊस दराप्रश्नी शेतकरी संघटनेला घेऊन ते रस्त्यावर उतरले आणि शरद जोशी हे नाव घराघरात पोहोचल. शरद जोशी हे २००४ ते २०१० या काळात राज्यसभेचे सदस्य होते. शेतकऱ्यांसाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला असून, शेतकरी चळवळीत त्यांचे मोठे योगदान आहे.
साहेबांची एक मुलगी अमेरिकेत आहे. तर दुसरी कॅनडा या देशात आहे. त्यामुळे शेतक-यांनी पुण्याकडे येण्याची घाई करु नये. शरद जोशींवर अंत्यसंस्कार कधी आणि कुठे होणार हे उद्या संध्याकाळी जाहीर करू असे शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष गुणवंत पाटील हंगरगेकर यांनी सांगितले.
शेतकऱ्यांचे प्रश्न हिरीरीने मांडणारा चळवळीतील कार्यकर्ता, शेती अर्थव्यवस्थेला जागतिक व्यासपीठावर मार्गदर्शन करणारा आणि चळवळीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण करणारा नेता, श्री शरदजी जोशी यांच्या निधनाने आपण गमावला आहे. शेतकऱ्यांना उत्तम बाजारपेठ मिळावी आणि नवनवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेती अधिक समृद्ध व्हावी, यासाठी त्यांचे समर्पित जीवन आणि संघर्ष कायम स्मरणात राहील. माझी भावपूर्ण श्रद्धांजली. शेतकऱ्यांचे हे प्रश्न सोडवण्यासाठी आपले सरकार कायम प्रयत्नशील आणि वचनबद्ध असेल. – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मी आज जो आहे, तो शरद जोशींमुळे. साखरसम्राटांच्या नजरेला नजर भिडवण्याचे सामर्थ्य त्यांच्यामुळे आले. शरद जोशींशी उद्या नागपुर येथे भेट ठरली होती, परंतु दुर्दैवाने ती अपुरी राहिली – खासदार राजू शेट्टीं
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा