कृत्रिम प्लास्टिक फुलांमुळे पर्यावरणाची हानी होत आहे. कृत्रिम फुलांवर बंदी घालण्याची मागणी मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच हरितगृह उभारण्याची मर्यादा किमान पाच एकरांपर्यंत करण्याची मागणी करण्यात आली आहे.याबाबत मावळातील शेतकऱ्यांनी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांना निवेदन दिले आहे. महाराष्ट्रातील शेती विषयक समस्या जाणून घेण्यासाठी तोमर राज्याच्या दौऱ्यावर आले आहेत. मावळ तालुक्यातील फूल उत्पादक शेतकरी मुकुंद ठाकर, ज्ञानेश्वर आडकर, दिलीप काळे, तानाजी शेंडगे, चंद्रकांत कालेकर, हेमंत कापसे, जयसिंग हुलावळे, ज्ञानेश्वर टाकर, रामदास पवार आदींनी तोमर यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांच्या समस्येकडे लक्ष वेधले.
मावळ तालुक्यात फूल लागवडीसाठी पाेषक वातावरण आहे. मावळातील गुलाब फुलांची परदेशात निर्यात करण्यात येते. गुलाब फुलांसह सजावटीसाठी वापरण्यात येणाऱ्या विविध फुलांची लागवड मावळ तालुक्यात केली जाते. राज्यातील फूल उत्पादनात मावळ तालुक्याचा वाटा मोठा आहे. वर्षभर मावळातील फुलांना विविध समारंभासाठी मागणी असते. फूल उत्पादन निसर्गावर अवलंबून आहे. कृत्रिम प्लास्टिक फुलांमुळे फुलांच्या मागणीत घट होत आहे. त्यामुळे कृत्रिम प्लास्टिक फुलांवर बंदी घालण्यात यावी. फूल उत्पादक शेतकऱ्यांसाठी शासकीय अनुदान, सवलत मिळणे गरजेचे असल्याचे पवना फूल उत्पादक संघाचे अध्यक्ष मुकुंद ठाकर यांनी नमूद केले.हरितगृहे उभारणीची मर्यादा किमान पाच एकरापर्यंत करावी. हरितगृहास अनुदान मिळण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात यावी. फूल निर्यातदार शेतकऱ्यांना अडचणी सोडविण्यात याव्यात, असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी कृषी संचालक डाॅ. कैलास मोते, दिलीप झेंडे, विकास पाटील, दशरथ तांबोळी, अतिरिक्त प्रकल्प संचालक ज्ञानेश्वर बोटे, जिल्हा कृषी अधीक्षक सुभाष काटकर, कृषी उपसंचालक विजय कानडे, मावळ तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ आदी उपस्थित होते.
हेही वाचा >>>पुणे : बटाटा, टोमॅटो, ढोबळी मिरची, शेवगा, मटारच्या दरात वाढ
फूल निर्यातीसाठी केंद्राकडून सहाय
फूल उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर तोमर यांनी केंद्र सरकारकडून मदत करण्याचे आश्वासन देण्यात आले. मावळ तालुक्यात फुले लागवडीसाठी पोषक वातावरण आहे. फुलांच्या निर्यातदार शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यात येतील. कृषी आयुक्त धीरज कुमार यांना शेतकऱ्यांच्या समस्या थेट बांधावर जाऊन समजावून घ्याव्यात, अशा सूचना केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी दिल्या.