स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाने हर घर तिरंगा अभियान राबविण्याचे आवाहन केले आहे. स्वातंत्र्य प्राप्तीला ७५ वर्ष झाली तरी शेतकरी अद्यापही पारतंत्र्यातच असल्याचा अनुभव असल्यामुळे शेतकरी या उत्सवात सहभागी होणार नाहीत. आपल्या भावना शेतकऱ्यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना कळवाव्यात, असे आवाहन स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

घनवट म्हणाले की, “देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. महाराष्ट्र शासनाने, ११ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट दरम्यान सर्व नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा फडकविण्याचे आवाहन केले आहे. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांत भारतातील शेतकऱ्यांचे फक्त शोषणच झाले. शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. शेतीमालाचे भाव जाणीवपूर्वक पाडण्याचे कारस्थान सतत सुरू आहे. त्यासाठी निर्यातबंदी, साठ्यांवर मर्यादा, अनावश्यक आयात यासारखी शेतकरी विरोधी हत्यारे वापरली जात आहेत. शेतकऱ्यांचे भूमी हक्क संकुचित केले आहेत, अन्यायाविरुद्ध न्यायालयात दाद मागण्यास सुद्धा बंदी आहे, हे कसले स्वातंत्र्य?”

देश आर्थिक संकटात लोटला जात आहे –

तसेच “ इंडियाच्या सरकारकडून भारतातील शेतकऱ्यांच्या होणाऱ्या शोषणाचा परिणाम म्हणून लाखो शेतकरी आत्महत्या करीत आहेत. देशात गरीबी आहे, बेरोजगारी आहे. देश आर्थिक संकटात लोटला जात आहे. अशा परिस्थितीत न मिळालेल्या स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करण्यात भारतातील शेतकऱ्यांना रस नाही.”, असे यासंबंधीच्या निवेदनात म्हटले आहे.

स्वातंत्र्यप्राप्ती नंतरही शेतकऱ्याचे मरण हेच सरकारचे धोरण –

“ अनेकांच्या बलिदानानंतर मिळालेल्या भारताच्या स्वातंत्र्याबद्दल शेतकऱ्यांना अभिमान आहे व सालाबादप्रमाणे १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन शेतकरी साजरा करतील परंतु ७५ वर्ष होऊनही कृषिप्रधान भारतातील शेतकऱ्यांपर्यंत खरे स्वातंत्र्य पोहोचलेच नाही याची खंत आहे. आजही शेतकऱ्यांना व्यवसायाचे स्वातंत्र्य नाही, तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य नाही, जमीन किंवा व्यवसायाच्या विस्ताराचे स्वातंत्र्य नाही. स्वातंत्र्यप्राप्ती नंतरही शेतकऱ्याचे मरण हेच सरकारचे धोरण राहिले आहे, हे सरकारच्या लक्षात आणून देण्यासाठी व सरकारच्या अशा धोरणाबाबत नाराजी व्यक्त करण्यासाठी हे निवेदन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पाठवायचे आहे.”, असेही घनवट म्हणाले.

“ महाराष्ट्रातील जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी हे पत्र महाराष्ट्र शासनाला पाठवले तर शेतकऱ्यांच्या समस्यांवर काही उपाय योजना होण्याची अपेक्षा करता येईल. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या मोहिमेत सहभागी होऊन आपल्या भावना महाराष्ट्र शासनाला कळवाव्यात.”, असे आवाहन अनिल घनवट यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmers not eager to participate in har ghar tricolor utsav anil ghanwat pune print news msr