पुणे : ‘जो शेतकरीविरोधी तो आमचा विरोधी आहे. मग ते एकनाथ शिंदे असोत किंवा मुख्यमंत्री फडणवीस. निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार, असे सांगणारे मुख्यमंत्री त्यावर काही बोलत नाहीत. त्यामुळे सातबारा कोरा करण्यात नेमकी अडचणी काय आहे, हे माहिती नाही,’ अशी टीका प्रहार संघटनेचे संस्थापक, माजी आमदार बच्चू कडू यांनी केली.

राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने गंज पेठेतील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात आयोजित केलेल्या युवा संघर्ष निर्धार परिषदेत ते बोलत होते.

कडू म्हणाले, ‘मुख्यमंत्र्यांनी शेतकरी कर्जमाफीवर बोला अशी आमची मागणी आहे. मात्र, ते त्यावर बोलतच नाहीत. शेतकरी कर्जमाफीवर बोलण्यासाठी त्यांना मुहूर्त काढायचा आहे का? निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. मात्र, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर आता ते काहीच बोलत नाहीत. राजकीय अस्तित्वापेक्षा लोकांचे जगणे सोपे व्हावे, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. राजकारणामध्ये पदापेक्षा काही भूमिका कठोरपणे घेणे आवश्यक असते.’