विविध योजनांतर्गत शासनाकडून मिळालेल्या कर्जाच्या विनियोगासाठी शेतकऱ्यांना रुपे हे डेबिट कार्ड देण्याच्या केंद्र शासनाच्या योजनेची अंमलबजावणी करण्याची राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेची (नाबार्ड) योजना आहे. चालू आर्थिक वर्षांमध्ये सर्व जिल्हा व ग्रामीण बँकांना ही योजना राबविण्यासाठी नाबार्डकडून प्रोत्साहन देण्यात येणार असून, त्या माध्यमातून शेतकऱ्यांना हे कार्ड देण्यात येणार आहे. या कार्डच्या वापरातून कृषी साहित्याच्या खरेदीसह ‘एटीएम’ मधून पैसेही काढता येणार आहेत.
नाबार्डचे सरव्यवस्थापक एम. व्ही. अशोक यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. रुपे कार्डची योजना राबविण्याबाबत जिल्हा व इतर ग्रामीण बँकांच्या प्रतिनिधींची लवकरच बैठक घेण्यात येणार आहे. रायगड जिल्हा सहकारी बँकेने ही योजना राबविली असून, हे मॉडेल इतर बँकांसमोर ठेवण्यात येणार आहे. शासनाकडून शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज रोख स्वरूपात मिळणार नाही. एखाद्या कृषी साहित्याची, खते किंवा बियाणांची खरेदी करायची असल्यास संबंधित व्यावसायिकाकडील यंत्राच्या माध्यमातून रुपे कार्डमधून ही रक्कम परस्पर कापली जाईल. या कार्डच्या वापरातून एटीएममधून रोख रक्कमही काढता येईल. या योजनेसाठी जिल्हा व सर्व ग्रामीण बँकांना जोडण्यात येणार आहे. या वर्षांतच ही योजना पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
नाबार्डने मागील आर्थिक वर्षांत केलेल्या कर्ज वितरणाची व राबविलेल्या विविध योजनांची माहितीही अशोक यांनी पत्रकार परिषदेत दिली. २०१२- २०१३ मध्ये राज्यातील शेती व ग्रामीण विकासासाठी नाबार्डने ७३४८ कोटी रुपये वित्तसाहाय्य दिले. त्यात जिल्हा बँका, ग्रामीण बँका, रस्ते व पुलाचे प्रकल्प, विविध जिल्ह्य़ातील उत्पादक संघ, महिला बचत गटांना साहाय्य, आदिवासी विकास योजना, पाणलोट विकास आदी योजनांचा समावेश आहे. शेतकऱ्यांना छोटय़ा प्रमाणावर मालाची साठवणूक करता यावी, यासाठी लहान गोदामे बांधण्यासाठी पुढील काळात शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य करण्यात येणार आहे, असेही अशोक यांनी सांगितले.