तानाजी काळे, लोकसत्ता

इंदापूर : करोना विषाणूचा  प्रसार रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमध्ये वाढ झाल्यानंतर शेतातील नाशवंत शेतमाल विक्रीचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.

उन्हाळ्यामध्ये मार्च, एप्रिल महिन्यात शेतामध्ये तयार झालेला  शेतमाल हा नाशवंत स्वरूपाचा असतो. कलिंगड, खरबूज, काकडी, त्याचबरोबर वांगी, टोमॅटो ,दोडका या फळभाज्या, विविध प्रकारची फळे या हंगामामध्ये शेतकऱ्यांकडे मोठय़ा प्रमाणामध्ये उपलब्ध असतात. त्याचबरोबर कोथिंबीर, पालक अन्य पालेभाज्या मोठय़ा प्रमाणामध्ये शेतकरी लागवड करत असतात. उन्हाळ्यात ही पिके म्हणजे शेतकऱ्यांना रोख पैसे असल्यामुळे शेतकरी आवर्जून ही पिके घेतात.

यावर्षी कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी टाळेबंदी जाहीर झाली. महाराष्ट्रामध्ये विशेष करून पुण्यामध्ये या विषाणूचा प्रसार आढळून आल्यामुळे अनेक ठिकाणी बाजार समित्यांचे  कामकाज बंद झाले. ग्रामीण भागातील आठवडी बाजार, त्याचबरोबर यात्रा-जत्रा रद्द झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या नाशवंत मालाला बाजारपेठ उपलब्ध नसल्यामुळे या मालाचा करायचं काय, हा प्रश्न निर्माण झाला आहे. बाजारपेठेत विक्रीअभावी हा माल शेतामध्ये सडून चालला आहे.

दौंड, इंदापूर, बारामती परिसरामध्ये शेतमाल विक्रीसाठी मोठी बाजारपेठ आहे. परंतु, सध्या टाळेबंदीमुळे शेतकऱ्यांना आपला शेतमाल विक्रीसाठी नेताना अनेक अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते. त्याचबरोबर अनेक बाजार समित्यांचे कामकाज बंद आहे .त्यामुळे तयार झालेला माल शेतातच पडून आहे. द्राक्ष, डाळिंब फळ बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. कलिंगड, खरबूज, काकडी हा शेतमाल तयार व्हायला आणि टाळेबंदी लागायला एकच वेळ आल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

काही ठिकाणी ऑनलाइन पद्धतीने शेतमालाची विक्री आणि वितरण करण्याचा प्रयत्न होत असला तरी त्याला मर्यादा येत आहेत. या व्यवस्थेतून मोठय़ा प्रमाणामध्ये शेतमाल ग्राहकापर्यंत पोहोचू शकत नाही. हा शेतमाल साठवून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांकडे यंत्रणा नसल्यामुळे  सध्या शेतात हा माल सडून चालला आहे.

Story img Loader