‘पीएमआरडीए’च्या हद्दीत २१० किलोमीटर लांबीचा ‘बीआरटी’ मार्ग

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खासगी वाहतुकीचा रस्त्यावरील भार कमी करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पुणे मेट्रोपॉलिटन रिजनल डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटी- पीएमआरडीए) र्सवकष वाहतूक आराखडय़ात जलदगती बससेवेला प्राधान्य देण्यात आले आहे. मेट्रोच्या १२५ किलोमीटर लांबीच्या आठ मार्गिकांबरोबरच ७० किलोमीटर लांबीची लाईट मेट्रो रेल्वे आणि तब्बल २१० किलोमीटर लांबीचे बीआरटीचे (बस रॅपिड ट्रॉन्झिट- बीआरटी) जाळे आराखडय़ात प्रस्तावित करण्यात आले आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांचे प्रस्तावित बीआरटी आणि मेट्रो मार्ग लक्षात घेता पीएमआरडीएला या दोन्ही यंत्रणांशी समन्वय ठेवावा लागणार असून समन्वय राहिला नाही तर पीएमआरडीएचा हा र्सवकष आराखडा कागदावरच राहण्याची शक्यता आहे.

राष्ट्रीय शहरी वाहतूक धोरण आणि महाराष्ट्र राज्य शहरी वाहतूक धोरणाच्या मसुद्याप्रमाणे पीएमआरडीएने र्सवकष वाहतूक आराखडा (कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन- सीएमपी) तयार केला आहे. यापूर्वीचा र्सवकष वाहतूक आराखडा १० वर्षांपूर्वी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांनी केला होता. मात्र दर पाच वर्षांनी आराखडा अद्ययावत करण्याची सूचना असल्यामुळे पीएमआरडीएने पुणे आणि पिंपरी-चिंचवड या शहरी भागासह, हिंजवडी, चाकण, वाघोली, तळेगाव अशा एकूण २ हजार १७२ चौरस किलोमीटर लांबीच्या क्षेत्रफळासाठी हा आराखडा केला आहे. महापालिकांमधील एकत्रित वाहतुकीचा विचार करून वाहतुकीच्या पायाभूत सुविधा, मेट्रो, वर्तुळाकार मार्ग, प्रस्तावित विमानतळ, बीआरटी मार्ग, नगर रचना योजना आणि दळणवळणाच्या बहुउद्देशीय स्थानकांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. यामध्ये आठ मेट्रो मार्गिकेप्रमाणेच बीआरटी मार्गाचे सहा नवे मार्ग प्रस्तावित आहेत.

रेल्वे आणि बस वाहतुकीवर या आराखडय़ात विशेष भर देण्यात आला आहे. एकूण वाहतूक वर्दळीच्या ७१ टक्के वाटा खासगी गाडय़ांचा आणि २९ टक्के वाटा बस आणि रिक्षा या वाहनांचा आहे. शाश्वत वाहतूक देण्यासाठी सार्वजनिक वाहतूक वर्दळीचा सहभाग ५० टक्क्य़ांपर्यंत वाढविणे आणि खासगी वाहतूक वर्दळीचा सहभाग ५० टक्क्य़ांपर्यंत कमी करणे असे उद्दिष्ट या आराखडय़ात ठेवण्यात आले आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांकडूनही त्यांच्या अंदाजपत्रकामध्ये बीआरटी मार्गाचे जाळे प्रस्तावित आहे. पीएमपीच्या माध्यमातून त्यावर काम सुरू आहे. याशिवाय महामेट्रोच्या माध्यमातून दोन्ही शहरात मेट्रो मार्गिकांचे विस्तारीकरण आणि नव्या मार्गाना मंजुरी देण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर या दोन्ही महापालिका, पीएमपी, मेट्रो यांच्याबरोबरच  वाहतूक पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाशी पीएमआरडीएला समन्वय साधावा लागणार आहे. या शासकीय यंत्रणांच्या समन्वयातूनच या आराखडय़ाची अचूक अंमलबजावणी होणार आहे.

आराखडय़ातील तरतुदी

* १२५ किलोमीटरचे मेट्रो मार्ग

* ७० किलोमीटरची लाईट मेट्रो

* १८ ठिकाणी बहुउद्देशीय स्थानके

* रेल्वे सेवा क्षमता वाढवून नवे मार्ग प्रस्तावित

* १२८ किलोमीटरचा वर्तुळाकार मार्ग

* सातारा, नगर, सोलापूर, नाशिक रस्त्याचे रुंदीकरण

* पुरंदर विमानतळासाठी पोहोच रस्ता

* पुणे-पिंपरीच्या हद्दीबाहेर ५ इंटर स्टेट बस टर्मिनस

* पुणे-पिंपरीच्या हद्दीबाहेर अवजड वाहनांसाठी ६ ट्रक टर्मिनस

*  पदपथांचे रुंदीकरण, सायकल मार्ग

* पादचारी सुरक्षितता आणि सक्षम सिग्नल यंत्रणा

* वाहनतळांसाठी शुल्क आकारणी

‘बीआरटी’चे प्रस्तावित मार्ग

* येरवडा-विमानतळ

* कस्पटे वस्ती-काळेवाडी फाटा

* पुणे महापालिकेचा वर्तुळाकार मार्ग

* पिंपरी-चिंचवड महापालिकेचा वर्तुळाकार मार्ग

* चिंचवड-तळवडे

* पीएमआरडीएचा वर्तुळाकार मार्ग

हा आराखडा शहरी वाहतुकीचा आहे. एकात्मिक वाहतूक योजनेअंतर्गत वाहतुकीच्या सर्व घटकांचा यामध्ये समावेश आहे. सुरक्षित, कार्यक्षम, विश्वासार्ह आणि विनाअडथळा वाहतुकीसाठी पुढील वीस वर्षांचे नियोजन आराखडय़ात मांडण्यात आले आहे.

– किरण गित्ते, महानगर आयुक्त, पीएमआरडीए

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fast network bus service in pune
Show comments