नयना पुजारी बलात्कार व हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी योगेश राऊत याला लवकरात लवकर अटक करावी. तसेच, आरोपी फरार झाल्यापासून पोलिस यंत्रणेने केलेल्या कार्यवाहीचा लेखी खुलासा देण्याच्या प्रमुख मागण्या ‘खुले व्यासपीठ’ या संघटनेने केल्या आहेत. या प्रकरणात कारवाईबाबतच्या दिरंगाईच्या निषेधार्थ उपोषण करण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकात  ८ मार्चपासून तीन दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. महिला अत्याचारासंबंधी पीडित महिलेची तक्रार दाखल करताना तिचे छायाचित्रण (इन कॅमेरा) व्हावे, प्रत्येक पोलिस ठाण्यामध्ये अशा तक्रारी नोंदविण्यासाठी स्वतंत्र महिला विभाग असावा, महिला अधिकाऱ्यामार्फतच तक्रार नोंदविली जावी, अशा विविध मागण्या या उपोषणात मांडण्यात येणार आहेत. या उपोषणाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचा जाहीर पाठिंबा असून नयना पुजारी हिचे पती व कुटुंबीय या उपोषणात सहभागी होणार आहेत.  शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या उपोषणात सहभागी व्हावे, असे आवाहन ‘खुला व्यासपीठ’ चे अजय भारदे यांनी केले.