पोटाचा घेर असणे किंवा ढेरी हे पुरुषांच्या जाडपणाचे लक्षण मानले जाते. पण, केवळ जाड असणे हाच निकष मानला तर, स्थूलतेमध्ये पुण्यातील महिलांनी पुरुषांवर मात केली आहे. एक हजार व्यक्तींच्या तपासणीनंतर हे निरीक्षण समोर आले आहे.
इन्स्टिटय़ूट ऑफ एक्सरसाइज अॅन्ड स्पोर्ट्स सायन्सेस (इंडिया) प्रा. लि. या संस्थेने शहराच्या विविध भागातील १ हजार ३४ व्यक्तींची तपासणी केली आहे. त्याद्वारे हा निष्कर्ष समोर आला आहे. दहापैकी सहा व्यक्ती या पोट सुटलेल्या असल्याचे आढळून आले आहे. महिलांमध्ये स्थूलतेचे प्रमाण हे पुरुषांच्या तुलनेमध्ये अधिक आहे. वयाची चाळिशी पार केलेल्या व्यक्तींमध्ये स्थूलतेचे प्रमाण हे सर्वाधिक आहे. गरजेपेक्षा अधिक जेवण, रात्री उशिरा आणि अधिक जेवण, जेवणासमवेत केलेले थंड पाणी आणि अपेयपान, व्यायामाचा अभाव ही साधारणपणे स्थूलतेची कारणे आहेत. ही स्थूलता माणसाला मधुमेही बनविण्यास कारणीभूत ठरू शकते, अशी माहिती संस्थेचे संचालक रूपेश अंकोलीकर यांनी मंगळवारी दिली.
संस्थेतर्फे मिटकॉनच्या सहकार्याने ‘हेल्थ अॅन्ड फिटनेस फॉर ऑल’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत ‘फिटनेस’ आणि ‘डिफिट डायबेटिस’ असे प्रत्येकी एक महिना कालावधीचे दोन कार्यक्रम होणार असून एका बॅचमध्ये २५ ते ३० जणांना प्रवेश देण्यात येणार आहे. यामध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी ७७०९०१२१६६ या मोबाइल क्रमांकावर आपले नाव आणि कोणत्या कार्यक्रमाला प्रवेश हवा आहे, या विषयीचा ‘एसएमएस’ करावयाचा आहे, असे अंकोलीकर यांनी सांगितले.
व्यक्ती पाहणी केलेल्यांची संख्या स्थूल व्यक्ती त्यांची टक्केवारी
पुरुष ६११ ३३६ ५५ टक्के
महिला ५७१ ४११ ७२ टक्के