लोणावळा : मुंबई-पुणे महामार्गावर टाकवे गावाजवळ भरधाव मोटार उलटून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना मध्यरात्री घडली. अपघातात तिघे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बबन राघु सुतार (वय ५०, रा. म्हाळसकर कॉलनी, वडगाव मावळ), आर्यन ज्ञानेश्वर भालेकर (वय १०, रा. जाधववाडी, नवलाख उंबरे, ता. वडगाव मावळ) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. अपघातात मयूर ज्ञानेश्वर पंडीत (वय २६, रा. मळवली), प्रवीण नागू लोहार (वय ३४, रा. मळवली), रत्नेश बाबासाहेब सोनवणे (वय २१, रा. भाजे) जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी मोटारचालक प्रवीण नागू लोहार (वय ३४, रा. मळवली) याच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. मयूर पंडीत याने याबाबत लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हेही वाचा…खेडमध्ये डॉ. कोल्हे आणि आढळराव-पाटील दोघांनीही धरले एकमेकांचे पाय
रविवारी रात्री बाराच्या सुमारास बाह्यवळण मार्गावरुन मोटार पुण्याकडे निघाली होती. टाकवे गावाजवळ मोटारचालक लोहार याचे नियंत्रण सुटले आणि मोटार खड्ड्यात कोसळली. अपघातात सुतार आणि भालेकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले तपास करत आहेत.