आज फादर्स डे. वडिलांचं कौतुक करण्याचा दिवस. ते आपल्या मुलांना तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपतात. त्यांना मोठं करून स्वतः च्या पायावर उभे करतात. आज एका अशाच यशस्वी वडिलांची यशोगाथा पाहणार आहोत. ज्यांनी आपल्या मुलीला MPSC ची तयारी करायला लावत, तू अधिकारी होऊ शकतेस अशी उमेद निर्माण केली, आणि ती मुलगी आज पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत आहे. संगीता जिजाभाऊ गोडे असं या महिला अधिकाऱ्याचे नाव असून त्या कर्तव्य दक्ष पोलीस अधिकारी आहेत.
संगीता जिजाभाऊ गोडे या पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यकरत आहेत. संगीता यांना लहानपणापासूनच लाल दिव्याच्या गाडीचे आणि खाकी वर्दीचे आकर्षण होते. त्याचा रुबाब वेगळाच असायचा असं त्या सांगतात. परंतु, खाकी वर्दी अंगावर आणायची कशी याचा कानमंत्र वडील जिजाभाऊ यांनी आपल्या मुलीला दिला. त्यांनी सांगितलं की, तुला दिवस-रात्र अभ्यास करावा लागेल, तेव्हा तुला कुठे हे सर्व मिळेल असं ते म्हणाले. तेव्हापासून संगीता यांनी स्पर्धा परीक्षेची (MPSC) तयारी सुरू केली आणि ते स्वप्न आज सत्यात उतरवलं. संगीता यांचं बालपण शिवरायांच्या भूमीत असलेल्या जुन्नर परिसरात गेलं आहे.
संगीता यांनी अभ्यास करायला सुरुवात केली. दिवस-रात्र त्या अभ्यास करत गेल्या. पहिल्या स्पर्धा परीक्षेत अपयश आलं. वडिलांनी पुन्हा प्रयत्न करण्यास सांगितले. त्यांनी पुन्हा जोमाने अभ्यास सुरू केला. अपयश ही यशाची पहिली पायरी असल्याचं म्हटलं जातं, परंतु संगीता यांना दुसऱ्यांदा अपयश आलं. त्या निराश झाला होत्या, त्यांचं मन अभ्यासात लागत नव्हतं. वडील जिजाभाऊ यांनी संगीताला खंबीर पाठिंबा देत तू या वेळेस नक्की उत्तीर्ण होणार असं ठाम सांगितलं आणि त्या चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्या. कदाचित संगीता यांनी स्पर्धा परीक्षा दिलीच नसती. मात्र वडिलांनी दिलेलं प्रोत्साहन खूप मोलाच ठरलं. घरात सर्व उच्चशिक्षीत असून आई पार्वती आरोग्य खात्यात नोकरी करतात. वडील हे शिक्षक होते. परंतु, त्यांनी नोकरी सोडून शेती करायला सुरुवात केली असं संगीता म्हणाल्या. ग्रामीण भागात असून ही वडील जिजाभाऊ यांनी शिक्षण घेण्यास किंवा नोकरी करण्यास कधीच विरोध केला नाही. आज जे काही आहे ते वडीलांमुळेच अस त्या अभिमानाने सांगतात.