राष्ट्रवादीशी संलग्न आमदार विलास लांडे यांच्या पत्नी मोहिनी लांडे यांना िपपरीच्या महापौरपदी अघोषित मुदतवाढ मिळाली. बराच काथ्याकूट होऊनही महापौर बदल होणार नसल्याचे पुरते स्पष्ट झाले असल्याने आता उपमहापौर बदलण्याची शक्यताही मावळली आहे. महापौरनाटय़ झाले, मात्र उपमहापौरपदाविषयी कोणतीच चर्चा नसल्याने राजू मिसाळ यांना तूर्त बिनबोभाट मुदतवाढ मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे.
पुणे महापालिकेत खांदेपालट होऊन वैशाली बनकर यांच्या जागी चंचला कोद्रे महापौर झाल्या. तर दीपक मानकर यांच्या जागी उपमहापौरपदी बंडू गायकवाड यांची निवड झाली. िपपरीत मात्र लांडे व मिसाळ या दोन्ही पदाधिकाऱ्यांना मुदतवाढ मिळाली. वास्तविक महापौरपदासाठी अनेक नगरसेविका इच्छुक आहेत. मात्र, विलास लांडे यांच्या विरोधात जाण्याची व त्यांची नाराजी ओढवून घेण्याची कोणाची तयारी नाही. निर्धारित सव्वा वर्षांची मुदत झाल्यानंतर मोहिनी लांडे राजीनामा देतील, असे कोणालाही वाटले नव्हते, त्यानुसारच घडले. झामाबाई बारणे, नंदा ताकवणे आदींनी प्रयत्न करून पाहिले. मात्र, अजितदादांनी कोणालाही दाद दिली नाही. या सगळय़ा घडामोडीत मिसाळ यांचेही नशीब फळफळले. मिसाळ मुळात धूर्त आहेत. ते कोणाविषयी भाष्य करत नाही, नेत्यांच्या गटबाजीत, वादात पडत नाही. आपण भले, आपले काम-धंदे भले, असे त्यांचे धोरण आहे. महापौरपद महिलांसाठी राखीव झाल्यानंतर अनेकांचा उपमहापौरपदावर डोळा होता. मोहिनी लांडे यांच्या स्पर्धेत राहिलेल्या नंदा ताकवणे यांचे नाव पुन्हा महापौरपदासाठी येऊ नये म्हणून त्यांच्याच प्रभागातून निवडून आलेल्या मिसाळांचे नाव ठरवून पुढे काढण्यात आले. कोणाच्या ध्यानीमनी नसताना ते उपमहापौर झाले. अजितदादांची कृपादृष्टी व नेत्यांचे कुरघोडीचे राजकारण मिसाळ यांच्या पथ्यावर पडले. निवडणुकांच्या तोंडावर िपपरी बालेकिल्ल्यात नस्ती डोकेदुखी नको म्हणून महापौरपदी लांडे कायम राहिल्या, त्याचा फायदा मिसाळांना मिळाला. त्यामुळे उपमहापौर होण्यासाठी प्रतीक्षेत असलेल्या नगरसेवकांना हात चोळत बसण्याशिवाय पर्याय राहिला नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा