पुण्याची पारंपरिक बाजारपेठ म्हणून नावाजल्या गेलेल्या तुळशीबागेला आता फर्ग्युसन रस्त्याशी स्पर्धा करावी लागत आहे. फर्ग्युसन रस्त्याची ओळख आता ‘फॅशन स्ट्रीट’ म्हणून होत असून, खरेदीसाठी तरुणाईचा ओढाही याच रस्त्याकडे वाढला आहे.
पुण्यातील महिला ग्राहकांचे खरेदीसाठी तुळशीबागेला प्राधान्य होते. पूर्वी फॅशन तुळशीबागेपासून सुरू व्हायची. कपडे, दागिने, चप्पल, बॅग अशा वस्तूंच्या खरेदीसाठी महिला आणि मुलींची पावले आपसूक तुळशीबागेकडे वळायची. मात्र, आता तुळशीबागेला फर्ग्युसन रस्त्याची स्पर्धा निर्माण झाली आहे. फर्ग्युसन रस्त्यावरील गोखले चौक ते ज्ञानेश्वर पादुका चौकापर्यंतचा रस्ता छोटय़ा दुकानांनी, पथारीवाल्या विक्रेत्यांनी भरून गेला आहे. रस्त्यावर कुडते, जॅकेट्स, खोटे दागिने, सॉफ्ट टॉईज, पर्सेस, चप्पल, शोभेची फुले अशा वस्तूंच्या विक्रेत्यांची गर्दी झाली आहे. एकमेकाला खेटून असलेल्या दुकानांमुळे या रस्त्याला तुळशीबागेचेच रूप येत आहे.
तुळशीबागेत ‘वस्तूंचा भाव’ किंवा घासाघीस करता यायची, हे त्याला मिळणाऱ्या चांगला प्रतिसादाचे एक प्रमुख कारण होते. फर्ग्युसन रस्त्याच्या बाजारपेठेचेही हे वैशिष्टय़ बनले आहे. विविध वस्तूंच्या छोटय़ा दुकानांबरोबरच ब्रँडेड शोरूम्स, प्रसिद्ध हॉटेल्सबरोबर खाद्य पदार्थाचे छोटे स्टॉल्स यामुळे ग्राहकाला ‘आऊटिंग पॅकेजच’ मिळत आहे. त्यामुळे फग्र्युसन रस्त्याच्या बाजारपेठेचा प्रतिसाद वाढत आहे.
तुळशीबागेचा ग्राहक बदलला
आता तुळशीबागेचा ग्राहक बदलला असल्याचे तिथले विक्रेते सांगतात. ‘तुळशीबाग’ ही पुण्याची एक ओळख बनल्यामुळे बाहेरून पुण्यामध्ये येणारे पर्यटक आवर्जून तुळशीबागेला भेट देतात. देशी आणि परदेशी पर्यटकांना तुळशीबागेचे अजूनही आकर्षण आहे. मात्र, तुळशीबागेच्या बाहेर बसणारे पथारीवाले आणि फर्ग्युसन रस्त्यासारख्या नव्या बाजारपेठा यामुळे व्यवसायावर परिणाम होत असल्याचे तुळशीबागेतील काही विक्रेत्यांनी सांगितले. शहराच्या बाजूने विकसित झालेल्या परिसरामध्ये जुन्या, नव्या बाजारपेठा आणि मॉल्स आहेत. शहराच्या वाढलेल्या विस्तारामुळे निवासी क्षेत्रही बाजारपेठेपासून दूर गेले आहे. यामुळेही गेल्या काही वर्षांमध्ये तुळशीबागेतील व्यवसायावर परिणाम झाला आहे, असे निरीक्षण विक्रेत्या संगीता सुपाते यांनी नोंदवले.
तुळशीबाग का नाही?.. सांगतेय तरुणाई
– पार्किंगसाठी जागा नाही
– खूप गर्दी
– फर्ग्युसन रस्ता महाविद्यालयाजवळ पडतो
– खरेदी व खाणे फग्र्युसन रस्त्यावर होते
– तुळशीबागेत विक्रेते वस्तू विकत घेण्यासाठी मागे लागतात
– फर्ग्युसन रस्त्यावर छोटे विक्रेते व ‘ब्रँडेड’ दुकानेही आहेत
काही गोष्टींसाठी मात्र तुळशीबागच
फर्ग्युसन रस्त्याला ‘फॅशन स्ट्रीट’ ची ओळख मिळाली असली, तरी काही गोष्टींसाठी तुळशीबागेचे महत्त्व अजूनही अबाधित आहे. पितळेच्या वस्तू, भरतकाम, विणकामाचे साहित्य, भांडी, रूखवताचे सामान या वस्तूंच्या खरेदीसाठी अजूनही तुळशीबागेचे स्थान अबाधित आहे.
फर्ग्युसन रस्त्यावर चालायचं कसं?
फर्ग्युसन रस्ता हा काही मुळातील बाजारपेठेचा भाग नाही. त्याची रचनाही त्या अनुषंगाने कधी झाली नाही. मात्र, आता रस्त्याच्या दुतर्फा निर्माण झालेल्या बाजारपेठेने नवे प्रश्नही समोर आणले आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूंचे पदपथ पथारीवाले आणि छोटय़ा दुकानांनी भरून गेले आहेत. त्यामुळे या रस्त्यावर पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागाच उरलेली नाही. या रस्त्यावर पूर्वीपासून असलेली कार्यालये, शिक्षणसंस्था, रुग्णालये यामध्ये बाजारपेठेची भर पडल्यामुळे रस्त्यावरची गर्दी, ट्रॅफिक ठप्प होण्याचा प्रश्न तीव्र झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा