एका चिठ्ठीवर एकदाच औषध देण्याबाबतच्या मोहिमेत अन्न व औषध विभागातर्फे (एफडीए)औषध विक्री दुकानांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. या मोहिमेला विक्रेत्यांचा विरोध टाळण्यासाठी विभागातर्फे जागृती मोहीम राबविण्यास सुरूवात झाली आहे. याअंतर्गत औषध विक्रेत्यांच्या सूचना बैठका घेतल्या जात आहेत. औषध विभागाचे सहआयुक्त बा. रे. मासळ यांनी ही माहिती दिली आहे.
मासळ म्हणाले, ‘‘रक्तदाबासारख्या निवडक आजारांवरील औषधे एकाच चिठ्ठीवर (प्रिस्किप्शनवर) एकाहून अधिक वेळा देता येणे शक्य आहे. मात्र ताप किंवा इतर संक्रमणात्मक आजारांवरील औषधे एका चिठ्ठीवर एकदाच मिळू शकणार आहेत. अशा वेळी त्या चिठ्ठीचा पुन्हा औषधे घेण्यासाठी उपयोग होऊ नये यासाठी फार्मासिस्टने चिठ्ठीवर शिक्का उमटवायचा आहे. अनेकदा ग्राहकच फार्मासिस्टकडे चिठ्ठी पुन्हा वापरता यावी यासाठी त्यावर शिक्का न मारण्याचा आग्रह धरतात. अशा वेळी गिऱ्हाईक दुसरीकडे जाऊ नये अशी भीती फार्मासिस्टना असते. अशा अडचणी लक्षात घेऊन या मोहिमेला विरोध होऊ नये यासाठी एफडीएचे प्रभाग निरीक्षक त्या- त्या भागांतील औषध विक्रेत्यांच्या बैठका घेऊन त्यांना मोहिमेसंबंधी सूचना देत आहेत. गेले पंधरा दिवस ही जागृती मोहिम सुरू आहे.’’
औषध विक्री दुकानात फार्मासिस्ट उपस्थित नसण्याबाबत एफडीएची मोहीम सुरूच आहे. गेल्या पंधरा दिवसांत २४० औषध विक्री दुकानांची तपासणी करण्यात आली आहे. यांपैकी २३ प्रकरणांमध्ये दुकाने बंद करण्यासाठी नोटिसा बजावण्यत आल्या आहेत.