अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) गुटखा, पानमसाला आणि सुगंधी तंबाखूचा साठा जप्त करण्याचा धडाका लावल्यानंतर विक्रेत्यांनी विक्रीसाठी निरनिराळ्या कल्पना लढवल्या. गुटखा पकडला जाऊ नये म्हणून धावत्या ट्रकमध्ये गुटख्याच्या पुडय़ा भरण्याची सोय करून तो कुठेही न साठवता परस्पर विकून टाकणे, गुटख्याचा पुरवठा करणारी वाहने आणि वाहनांचे चालक प्रत्येक पुरवठय़ाच्या वेळी बदलणे असे वेगवेगळे प्रयोग विक्रेत्यांनी केले. एका कल्पक विक्रेत्याने मात्र या सर्वावर कडी केली आणि एफडीएच्या कार्यालयाशेजारूनच तो राजरोसपणे पानमसाला आणि सुगंधी तंबाखूचा पुरवठा करू लागला!
खडक पोलीस ठाण्याजवळील एफडीएच्या कार्यालयाशेजारून एफडीएने मंगळवारी २ लाख ५३ हजार रुपयांचा पानमसाला आणि सुगंधी तंबाखू जप्त केली. एका राहत्या घरात हा गुटखा साठवला जात होता आणि खिडक्या नसलेल्या बंद व्हॅनमधून त्याचा पुरवठा केला जात होता. विशेष म्हणजे गेल्या वर्षीही या पुरवठादारावरील संशयावरून एफडीएने त्याच्यावर नजर ठेवली होती. पण त्या वेळी टाकलेल्या धाडीत गुटखा न सापडता केवळ बडिशेप सापडली होती.
अन्न विभागाचे सह आयुक्त शशिकांत केकरे म्हणाले, ‘‘गुटख्याच्या पुरवठादारांनी आपली पुरवठय़ाची पद्धत बदलल्याचे दिसून येत आहे. गुटखा आणि पानमसाल्याचा साठा लगेच पकडला जाऊ शकतो. त्यामुळे पुरवठादारांचा कल मालाचा कमीत कमी साठा करण्याकडे आहे. मालाची ऑर्डर घ्यायची, जेवढी ऑर्डर असेल तेवढाच माल मागवून तो पुढच्या ५-६ तासांत ठिकठिकाणी पुरवून मोकळे व्हायचे, अशी त्यांची कामाची पद्धत आहे. मंगळवारी पकडला गेलेला माल बंदिस्त व्हॅनमधून पुरवला जात होता. या व्हॅनला खिडक्याच नसल्यामुळे आत काय आहे हे कळायला मार्ग नव्हता. एफडीएने सापळा रचून हा माल पकडला.’’
नोव्हेंबरमध्ये पुण्यातून ६८ लाख रुपयांचा गुटखा, सुगंधी तंबाखू व सुगंधी सुपारी जप्त केली आहे. २० जुलै २०१४ ला गुटख्यावरील बंदी एका वर्षांने वाढवली गेल्यापासून पुणे विभागात १ कोटी २५ लाख रुपयांचे प्रतिबंधित पदार्थ पकडले गेले. त्यातील सर्वाधिक जप्ती पुण्यातच झाली आहे.

Story img Loader