सणासुदीत बाजारात गुजरातमधील भेसळयुक्त बर्फी विक्रीस पाठविण्यात येत असल्याचा प्रकार अन्न आणि ओैषध प्रशासनाने् (एफडीए) उघडकीस आणला. शहरातील विविध मिठाई विक्री दुकानांवर एफडीएने छापे टाकून पाच लाख ९० हजारांचा भेसळयुक्त बर्फीचा साठा जप्त केला.
गुजरातमधून अशोक राजाराम चौधरी याच्या गाडीतून भेसळयुक्त बर्फी विक्रीस पाठविण्यात आल्याची माहिती एफडीएच्या पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी गुजरात बर्फी, स्वीट हलवा, रिच स्वीट डिलाईट, स्वीट हलवा (ब्रीजवासी), स्वीट हलवा (पारस), स्पेशल बर्फी असे मिठाईचे नमुने ताब्यात घेतले. बुधवार पेठेतील अग्रवाल स्वीट मार्ट, कोंढवा परिसरातील कृष्णा डेअरी फार्म, गहुंजे, देहूरोड, बाले – वाडीतील हिरासिंग रामसिंग पुरोहित येथील मिर्ठा विक्री दुकानात भेसळयुक्त बर्फी मागविण्यात आल्याचे चाैकशीत उघडकीस आले. एफडीएच्या पथकाकडून त्यांची चौकशी करण्यात आली असून मिठाईचे नमुने अन्न तपासणी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. तपासणी अहवालानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती एफडीएकडून देण्यात आली.
हेही वाचा : वेदांतानंतर मध्य प्रदेशातील गुंतवणुकीसाठी पुण्यात शिवराज सिंह चौहानांचा प्रचार
दिवाळीत एफडीएकडून तपासणी मोहीम राबविण्यात आली आहे. मिठाई, रवा, मैदा, बेसन, खाद्यतेल, वनस्पती तूप, फरसाण असे ७० अन्न पदार्थ तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. खाद्यतेल पॅकिंगसाठी जुन्या डब्यांचा पुनर्वापर केल्याचे आढळून आले आहे. तीन ठिकाणी कारवाई करुन चार लाख ५१ हजार ४०० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. शीतगृहात साठवलेला मटार, मिठाई, तूप, खवा असा पाच लाख १० हजार ४०० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे.
मिठाई विक्रेत्यांवर कारवाईचा इशारा
शहरातील मिठाई विक्रेत्यांनी मिठाई वापराबाबतचा दिनांक याबाबतचा उल्लेख प्लास्टिक ट्रेवर करणे (बेस्ट बिफोर) बंधनकारक करण्यात आले आहे. मिठाई तयार करण्यासाठी स्वीट खव्याचा (गुजरात बर्फी) वापर करू नये. दूधापासून तयार केलेल्या चांगल्या दर्जाच्या खव्याचा वापर करावा. गुजरातमधील भेसळयुक्त खव्याचा वापर करुन मिठाई तयार करत असल्याचे आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा अन्न आणि ओैषध प्रशासानाने (एफडीए) दिला आहे.