उन्हाचा कडाका वाढल्यामुळे शहरात ठिकठिकाणी फळांचा रस अगदी अल्प दरात विकणारी दुकाने उभी राहिली आहेत. शाळांना सुट्टय़ा लागल्याने बर्फगोळे आणि पाणीपुरी विक्रेत्यांचीही चलती आहे. मात्र रस्त्यावर मिळणाऱ्या अन्नपदार्थाच्या सुरक्षिततेबद्दल नेहमीच चिंता व्यक्त केली जाते. ही चिंता दूर होऊन नागरिकांना रस्त्यावरही आरोग्यास सुरक्षित अन्नपदार्थ मिळावेत यासाठी अन्न व औषध प्रशासनातर्फे (एफडीए) मोहीम हाती घेण्यात आली आहे.
या मोहिमेअंतर्गत रस्त्यावर विकल्या जाणाऱ्या अन्नपदार्थाचे नमुने घेऊन त्यांची सुरक्षिततेच्या दृष्टीने तपासणी करणे सुरू आहे.
अन्न विभागाचे सह आयुक्त शशिकांत केकरे म्हणाले, ‘‘उन्हाळा सुरू झाल्याने पाच ते दहा रुपयांत फळांचा रस, बर्फगोळे विकणारी दुकाने ठिकठिकाणी उभी राहिली आहेत. हे व रस्त्यावर मिळणारे इतरही अन्नपदार्थ आरोग्यास सुरक्षित असावेत या दृष्टीने विभागातर्फे तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. अन्नपदार्थाचा दर्जा, ते बनविण्यासाठी वापरली जाणारी पद्धत आदी गोष्टींची तपासणी करण्यात येत आहे. या खाद्यपदार्थात वापरले जाणारे रंग ‘फूड ग्रेड’ आहेत का हे देखील पाहिले जात आहे. या विक्रेत्यांना परवाने घेण्याबद्दल यापूर्वीच आवाहन करण्यात आले आहे. तपासणीत अन्नपदार्थ असुरक्षित आढळल्यास किंवा विक्रेत्याकडे परवाना नसल्यास त्यांच्यावर न्यायालयात खटले भरण्यात येणार आहेत तर कमी दर्जाचे अन्नपदार्थ आढळल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल.’’