उन्हाच्या झळा सुरू झाल्यामुळे शहरात थंडगार सरबते आणि कुल्फीच्या गाडय़ांवरची गर्दी ओसंडून वाहू लागली आहे. अगदी रस्त्यारस्त्यावर फळांचे रस, सफरचंदाचे दूधयुक्त पेय, जलजिरा, सोडा अशा पेयांची लहान लहान दुकाने थाटली गेली आहेत. या पदार्थाचा दर्जा कसा असेल, त्यात वापरले जाणारे पाणी, दूध, रंग, वास खाण्यायोग्य असतील ना, याची नागरिकांना वाटणारी काळजी मात्र कायम आहे. यावर एक उपाय म्हणून खास उन्हाळ्यात भरपूर खप होणाऱ्या या पदार्थावर अन्न व औषध प्रशासन नजर ठेवणार आहे.
सरबते, ज्यूस, आइस्क्रीम, कुल्फी, बर्फाचा गोळा या पदार्थाचा दर्जा तपासण्यासाठी एफडीएच्या अन्न विभागातर्फे विशेष मोहीम सुरू करण्यात येणार आहे. १ एप्रिलपासून सुरू होणारी ही मोहीम जूनपर्यंत चालेल. अन्न विभागाचे सहायक आयुक्त दिलीप संगत यांनी ही माहिती दिली.
या मोहिमेत अन्न सुरक्षा अधिकारी रस्त्यावर विकल्या जाणाऱ्या पेयांच्या आणि आइस्क्रीमच्या दुकानांची आणि गाडय़ांची तपासणी करणार आहेत. तपासणी केलेल्या पदार्थाबद्दल शंका आल्यास त्यांचे नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवणार आहेत. पदार्थ खाण्यास असुरक्षित आढळला तर संबंधित विक्रेत्यावर न्यायालयीन कारवाई करण्यात येणार आहे. पदार्थ कमी दर्जाचा असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितावर दंडात्मक कारवाई होऊ शकते.
संगत म्हणाले, ‘‘उन्हाळ्यात सरबते, कुल्फी, आइस्क्रीम अशा पदार्थाचा खप प्रचंड वाढतो. खप वाढल्यामुळे नामवंत ब्रँडचा बनावट माल किंवा कमी दर्जाचा माल बाजारात येण्याची शक्यता असते. यावर नजर ठेवण्यासाठी अन्न विभागातर्फे मोहीम सुरू करण्यात येत आहे. नागरिकांनीही वेष्टनीकृत पदार्थ खरेदी करताना पॅकिंग डेट, एक्सपायरी डेट, वेष्टनावरील १४ आकडी परवाना क्रमांक आणि फूड सेफ्टी लोगो हे छापले आहे ना, याची खात्री करावी.’’

६ महिन्यांपर्यंत शिक्षा आणि १ लाखाच्या दंडाची तरतूद
सरबते आणि आइस्क्रीमसारखे पदार्थ खाण्यायोग्य नसल्याचे दिसून आल्यास कारवाईत दोषी ठरणाऱ्या व्यक्तीस ६ महिन्यांची शिक्षा आणि १ लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. तर, पदार्थ कमी दर्जाचा असल्यास विक्रेत्याला एफडीएच्या न्यायनिर्णय अधिकाऱ्यांकडून ५ लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.

नागरिकही नोंदवू शकतात तक्रारी
कमी दर्जाच्या किंवा खराब पदार्थाची विक्री होत असल्यास नागरिक एफडीएच्या सह आयुक्तांकडे तक्रार नोंदवू शकतात. तक्रार नोंदवण्यासाठी ०२०- २४४३०११३ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल.