नारायणगाव: आळेफाटा (ता. जुन्नर) येथील सिद्धिविनायक या गजबजलेल्या सोसायटीमध्ये सावजाच्या शोधात आलेल्या बिबट्याचे दर्शन घडल्याने एकच खळबळ उडाली. सोसायटीत लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्या आल्याचे स्पष्ट झाले आहे. सावज शोधत असताना बिबट्या आल्याचे चित्रीकरण समाजमाध्यमांवर प्रसारित झाले आहे.
जुन्नर तालुक्यात बिबट्याचे दर्शन हे जुन्नरकरांना नवीन नाही. मात्र, भरवस्तीत बिबट्या दिसू लागल्याने लोकांमध्ये घबराट पसरली आहे. मंगळवारी (२८ नोव्हेंबर) मध्यरात्री दोनच्या सुमारास आळेफाटा परिसरातील सिद्धिविनायक सोसायटी बिबट्या सावजाच्या शोधात थेट सोसायटीच्या पार्किंगमध्ये शिरला. सोसायटीला कंपाउंड नसल्याने रात्रीच्या वेळी मोकाट कुत्री त्या ठिकाणी बसतात.
हेही वाचा… राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे पुण्यात आगमन
बिबट्याला पाहून कुत्री जिन्यांवरून टेरेसवर पळाली. बिबट्याही त्यांच्या पाठीमागे जिन्यांच्या पायऱ्या वर चढत गेला खरा. परंतु, टेरेस न सापडल्याने बिबट्या पुन्हा खाली आला. बिबट्या सोसायटीमध्ये आल्यावर कुत्र्यांनी भुंकण्यास सुरवात केली. परंतु, ही घटना मध्यरात्री घडल्यामुळे कोणालाही जाग आली नाही. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये बिबट्या सोसायटीत दिसून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.