पुणे : यंदाच्या खरीप हंगामात तृणधान्यांचे लागवड क्षेत्र वाढविण्यासाठी कृषी विभागाने विशेष मोहीम आखली होती. तरीही खरिपात तृणधान्य लागवडीच्या क्षेत्रात घटीचा कल कायम आहे. कृषी विभागाच्या मोहिमेला शेतकऱ्यांनी फारसा प्रतिसाद दिल्याचे दिसत नाही. याचा परिणाम पुढील वर्षांत धान्यांच्या दरात होण्याची भीती आहे. पंतप्रधान मोदींनी ‘मन की बात’मध्ये कुपोषण टाळण्यासाठी तृणधान्यांवर भर द्या, असे आवाहन नुकतेच केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यात खरीप ज्वारीचे सरासरी क्षेत्र ३,१६,५५१ हेक्टर आहे. त्यापैकी यंदा ४६ टक्के क्षेत्रावर म्हणजे १,४५,६०० हेक्टरवर पेरणी झाली आहे. बाजरीचे सरासरी क्षेत्र ६,७५,१०५ हेक्टर आहे, त्यापैकी ६० टक्के क्षेत्रावर म्हणजे ४,०५,३७६ हेक्टरवर पेरणी झाली आहे. नाचणीचे क्षेत्र ७५,३१६ हेक्टर आहे, त्यापैकी ८९ टक्के म्हणजे ६६,७५१ हेक्टरवर पेरणी झाली आहे. तर राजगिरा, कोडू, कुटकी, वरई, बार्टी, सावा, राळं आदी तृणधान्यांचे सरासरी क्षेत्र ४३,५६१ हेक्टर आहे, त्यापैकी ८८ टक्के म्हणजे ३८,५२२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

गरज काय?

शेतकरी अद्याप तृणधान्यांच्या पारंपरिक बियाणांचा वापर करतात. कृषी विद्यापीठे, संशोधन केंद्रामधून तृणधान्यांच्या सुधारित वाणांसाठी संशोधन झाले पाहिजे. जास्त उत्पादन देणारे वाण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे. तृणधान्यांच्या लागवड पद्धतीवरही संशोधन झाले पाहिजे.

सध्या जे संशोधन झालेले आहे, ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेले नाही. तृणधान्यांची लागवड करणारे बहुतेक शेतकरी गरीब, अल्पभूधारक आणि दुर्गम भागात राहणारे आहेत. त्यांच्या अडचणी डोळय़ासमोर ठेवून कृषी विभागाने नियोजन करायला पाहिजे – महेश लोंढे, तृणधान्यांवर आधारित प्रक्रिया उद्योजक 

तृणधान्यांच्या लागवड क्षेत्रात वाढ होण्यासाठी विशेष मोहीम राबविली होती. पण, अपेक्षित परिणाम दिसून आला नाही. ही मोहीम सुरूच राहणार आहे. पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेसारख्या योजनांअंतर्गत तृणधान्यांवर आधारित प्रक्रिया उद्योग सुरू करण्यावर आणि उत्पादित पदार्थाच्या प्रचार, प्रसिद्धीवर भर देणार आहोत. 

– विकास पाटील, संचालक (विस्तार आणि विकास)

परिस्थिती काय?

गेल्या वर्षी पेरणी झालेल्या क्षेत्राच्या तुलनेत यंदा ज्वारीची लागवड ४६ टक्के, बाजरी ६० टक्के, नाचणी ८९ टक्के आणि राजगिरा, कोडू, कुटकी, वरई, बार्टी, सावा, राळ आदींची पेरणी जेमतेम ८८ टक्क्यांवर झाली आहे.

अपेक्षेहून कमी..

राज्याच्या कृषी विभागाने प्रत्येक शेतात, शेतीच्या बांधावर तृणधान्याची लागवड करण्याची आणि त्यासाठी बियाणे पुरवठा करण्याची मोहीम राबविली होती. तरीही यंदाच्या खरीप हंगामात अपेक्षित लागवड होऊ शकली नाही.

थोडी माहिती..

आंतरराष्ट्रीय पातळीवर यंदा तृणधान्ये वर्ष साजरे केले जात आहे. तृणधान्यांचे महत्त्व विविध प्रकारे समजावून सांगितले जात आहे.