पुणे : वीज तोडण्याची भीती दाखवून सायबर चोरट्याने ज्येष्ठ महिलेच्या बँक खात्यातून सात लाख ६६ हजार रुपये लांबविल्याची घटना कोरेगाव पार्क भागात घडली.याबाबत एका ज्येष्ठ महिलेने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी माहिती-तंत्रज्ञान कायदा; तसेच फसवणूक केल्या प्रकरणी चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार महिलेच्या मोबाइल क्रमांकावर चोरट्याने संपर्क साधला होता. महावितरणमधून बोलत असल्याची बतावणी चोरट्याने केली होती. गेल्या महिन्यात वीज बिल भरले नसल्याने वीज कापण्याची कारवाई करण्यात येणार असल्याची धमकी चोरट्याने महिलेला दिली.
त्यानंतर चोरट्याने महिलेला क्विक सपोर्ट ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. महिलेने संबंधित ॲप डाऊनलोड केले. त्याद्वारे चोरट्याने महिलेच्या बंँक खात्याची गोपनीय माहिती घेऊन बँक खात्यातून सात लाख ६६ हजार ५९ रुपये लांबविले. बँक खात्यातून पैसे लांबविण्यात आल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपाली भुजबळ तपास करत आहेत.
हेही वाचा : पुणे : जागतिक टपाल दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन
वीज तोडण्याची भीती दाखवून अनेकांची फसवणूक
महावितरणकडून वीज तोडण्यात येणार असल्याची भीती दाखवून नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. अशा प्रकारच्या बतावणीवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.