पुणे : स्वातंत्र्याच्या वेळी आम्हाला मोफत शिक्षणाचे आश्वासन दिले होते. सरकारने आईच्या दुधाप्रमाणे शिक्षणाची जबाबदारी घेतली पाहिजे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील शुल्कवाढ मागे घेतलीच पाहिजे. त्याचबरोबर मोफत शिक्षण मिळाले पाहिजे ही मागणी असायला हवी. विद्यापीठ पैसे नाही असे म्हणते यावर काय बोलायचे, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी मांडले.
विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीतर्फे विद्यापीठात शुल्कवाढीविरोधात ‘कॉफी विथ स्टुडंट्स’ या कार्यक्रमात डॉ. आढाव बोलत होते. ॲड. असीम सरोदे, ॲड. भाऊसाहेब आजबे, राहुल डंबाळे, सचिन पांडुळे, नवनाथ मोरे, निश्चय साक्षात साधना, प्रा. सुरेश देवढे, सोमनाथ लोहार, चेतन दिवाण, सचिन शिरसाठ आदी या वेळी उपस्थित होते.करोनाचे कारण पुढे करून शुल्कवाढ करणे चुकीचे आहे, कोणत्या आधारे शुल्कवाढ केली हा प्रश्न विचारून त्यामागील कारणे शोधली पाहिजेत. विद्यापीठ हे कमाई करण्याचे साधन नाही. शुल्कवाढ चुकीची नसल्यास विद्यापीठाने त्याबाबत स्पष्टीकरण द्यावे, असे ॲड. सरोदे यांनी सांगितले.