पुणे : प्रवाशांच्या सोयीसाठी रामवाडी मेट्रो स्थानक ते लोहगाव विमानतळ या दरम्यान पीएमपीकडून पूरक सेवा (फिडर सेवा) देण्यास सुरुवात झाली आहे. या सेवेअंतर्गत दर पंचवीस मिनिटांनी गाड्या सोडण्यात येणार असून अंतरानुसार पाच ते दहा रुपये तिकीट दर निश्चित करण्यात आला आहे.
मेट्रो प्रकल्पाअंतर्गत रूबी हाॅल ते रामवाडी या दरम्यानची मेट्रोची प्रवासी सेवा बुधवारपासून सुरू करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाइन पद्धतीने या सेवेचे उद्घाटन केले. त्यानंतर पीएमपीच्या पूरक सेवेला तातडीने प्रारंभ करण्यात आला. विभागीय आयुक्त डाॅ. चंद्रकांत पुलकुंडवार, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, खासदार प्रा. मेधा कुलकर्णी, आमदार सुनील टिंगरे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार जगदीश मुळीक आणि बापूसाहेब पठारे यावेळी उपस्थित होते.
हेही वाचा >>>अखेर ठरलं! पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलच्या उद्घाटनाला मुहूर्त
या पूरक सेवेअंतर्गत विजेवर धावणाऱ्या गाड्यांच्या माध्यमातून सेवा दिली जाणार आहे. या गाड्या वातानुकूलीत असून त्याचे तिकीट दरही निश्चित करण्यात आले आहेत. अंतरानुसार पाच रुपये ते दहा रुपये असा तिकीट दर असून दर पंचवीस मिनिटांनी या मार्गावर गाड्या धावणार आहेत, अशी माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली.
या सेवेमुळे प्रवाशांना मेट्रो स्थानकापर्यंत पोहोचणे सोयीचे होणार असून प्रवासी संख्या आणि उत्पन्नात वाढ झाल्यानंतर या मार्गावरील गाड्यांची संख्या वाढविण्याचे नियोजित आहे. रामवाडी मेट्रो स्थानक ते लोहगाव विमानतळ (सोकोरे नगर मार्गे) या मार्गावरील पूरक सेवेत हयात हाॅटेल, वेकफिल्ड कंपनी, साकोरे नगर, नेक्सा शोरूम, विमाननगर लेन क्रमांक २१ आणि २२, क्रोमा माॅल असे थांबे असणार आहेत. तर संजय पार्क लेन क्रमांक ६ मार्गे धावणाऱ्या गाडीचा मार्ग लोहगाव विमानतळ, क्रोमा माॅल, सिंबायोसिस काॅलेज, विमाननगर, संजय पार्क लेन क्रमांक ६, मारुती सुझुकी शोरूम, साकोरे नगर, चेक-मेट हाॅटेल, रामवाडी असा असेल.