पुणे : राज्यातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे सवलतीच्या क्रीडा गुणांचे अर्ज यंदा ‘आपले सरकार’ संकेतस्थळावरून भरण्यात आले आहेत. मात्र, या अर्जांसाठी राज्य मंडळ आणि आपले सरकार संकेतस्थळ यांच्याकडून शुल्क आकारणी करण्यात येत आहे. त्यामुळे क्रीडा गुणांसाठी दोन स्वतंत्र शुल्कांचा भार विद्यार्थी, शाळा, महाविद्यालये, शिक्षकांवर पडत असल्याचे चित्र आहे.

क्रीडा क्षेत्रात नैपुण्य प्राप्त केलेल्या खेळाडू विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावीच्या परीक्षेत सवलतीचे गुण देण्यात येतात. जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय स्तरासाठी निश्चित केलेल्या निकषांनुसार सवलतीचे गुण दिले जातात. क्रीडा गुणांसाठी गेल्या वर्षीपर्यंत त्यासाठी प्रत्यक्ष अर्ज (ऑफलाइन) करावा लागत होता. यंदा या प्रक्रियेत बदल करून ही प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली. शाळा, महाविद्यालयांनी आपले सरकार संकेतस्थळावर प्रत्येक खेळाडूची स्वतंत्रपणे नोंदणी करणे, त्यासाठीची आवश्यक कागदपत्रे प्राचार्य, मुख्याध्यापक, खेळाडूने स्वसाक्षांकित करून संकेतस्थळावर सादर करण्याच्या सूचना क्रीडा विभागाने दिल्या. ऑनलाइन प्रक्रियेव्यतिरिक्त कोणत्याही परिस्थितीत प्रत्यक्ष अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, ऑनलाइन अर्जांवर शिफारस करून ते राज्य मंडळाला पाठवले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. या अर्जासाठी आपले सरकार संकेतस्थळाकडून २३ रुपये ६० पैसे शुल्क आकारण्यात आले आहे. आता राज्य मंडळाचे २५ रुपये शुल्क भरण्याचे निर्देश शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना देण्यात आले आहेत.

गेल्या वर्षीपर्यंत क्रीडा गुणांचे अर्ज जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांकडे जमा केले जात होते. त्या वेळी शुल्क आकारणी केली जात नव्हती. मग यंदा ऑनलाइन अर्जांसाठी स्वतंत्र शुल्क कशासाठी, असा प्रश्न क्रीडा शिक्षिका आणि उपप्राचार्य सुवर्णा देवळाणकर यांनी उपस्थित केला. दोन स्वतंत्र शुल्क आकारणी केली जात असल्याने काही शाळा-महाविद्यालये खेळाडू विद्यार्थ्यांकडून शुल्काची रक्कम घेतात, तर काही शाळा, महाविद्यालये, शिक्षक शुल्काची रक्कम भरतात. या शुल्काचा भार खेळाडूंवर पडता कामा नये. ऑनलाइन प्रक्रिया किचकट असून, त्यात सुलभता आणावी किंवा पूर्वीचीच पद्धत कायम ठेवावी, असेही त्यांनी नमूद केले. क्रीडा नैपुण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना सवलतीचे क्रीडा गुण दिले जातात. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठीच ही तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे राज्य मंडळाव्यतिरिक्त स्वतंत्र शुल्क आकारणी करणे चुकीचे आहे, असा मुद्दा माजी मुख्याध्यापक महेंद्र गणपुले यांनी उपस्थित केला.

क्रीडा गुण प्रस्तावांच्या छाननीसाठी राज्य मंडळाकडून प्रतिविद्यार्थी २५ रुपये शुल्क गेल्या दोन वर्षांपासून आकारण्यात येते. त्यात वाढ करण्यात आलेली नाही. ‘आपले सरकार’ संकेतस्थळावरून प्रस्ताव सादर करण्याची प्रक्रिया यंदापासून सुरू करण्यात आली. हे संकेतस्थळ क्रीडा विभागाचे असल्याने त्याचे शुल्क स्वतंत्र आहे. – शरद गोसावी, अध्यक्ष, राज्य मंडळ