हिराबाईंच्या धाडसामुळेच आमची वाट प्रशस्त; अभिजात संगीतातील कलाकारांची भावना
विद्याधर कुलकर्णी
पुणे : ज्या काळात गाणं-बजावणं निषिद्ध मानले जात होते त्या काळात गानहिरा हिराबाई बडोदेकर यांनी स्वरमंचावरून गायन प्रस्तुत केले, या क्रांतिकारी घटनेची मंगळवारी (२१ डिसेंबर) शताब्दीपूर्ती होत आहे. हिराबाई यांच्या धाडसामुळेच आमची वाट प्रशस्त झाली, अशा शब्दांत अभिजात संगीतातील डॉ. प्रभा अत्रे आणि पद्मा तळवलकर या मान्यवर कलाकारांनी आपली भावना व्यक्त केली.
स्वरमंचावरून महिलांच्या गायन प्रस्तुतीची परंपरा सुरू करणाऱ्या गायिका हिराबाई बडोदेकर यांचा पहिला जाहीर जलसा २१ डिसेंबर १९२१ रोजी झाला होता. या घटनेला मंगळवारी शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. स्वातंत्र्यापूर्वीच्या कालखंडात महिलांनी जाहीर गायन करणेच नव्हे, तर केवळ गुणगुणणे हेदेखील पाप मानले जात होते. अशा काळात व्यासपीठावरून गायन होणे ही क्रांतिकारी घटना मानली जाते. गानमहर्षी पं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्या प्रेरणेने हिराबाईंच्या रूपाने महिलांचा स्वरमंचावर प्रवेश झाला आणि अभिजात संगीतातील महिलांचे योगदान अधोरेखित करण्याची सुरुवात झाली. खरं तर ही माझ्या जन्मापूर्वीची घटना आहे. पण, स्वरमंचावरून गायन सादर करण्याचा बहुमान लाभलेल्या हिराबाई बडोदेकर या मला गुरू म्हणून लाभल्या हे माझे भाग्य आहे, अशी भावना किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांनी व्यक्त केली. त्यांनी आमच्यासारख्या पुढच्या पिढीतील कलाकारांसाठी कला सादरीकरणाचा रस्ता खुला केला, असेही त्यांनी सांगितले. डॉ. अत्रे म्हणाल्या,की मी पं. सुरेशबाबू माने यांची शिष्या होते. मिरज येथे उस्ताद अब्दुल करीम खाँ यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमात हिराबाई यांचे गायन ऐकले होते. १९५३ मध्ये पं. सुरेशबाबू यांचे निधन झाले. १९५५ मध्ये मला केंद्र सरकारची शिष्यवृत्ती मिळाली होती. किराणा घराण्याची तालीम मिळावी या उद्देशातून माझ्या गुरू म्हणून हिराबाई यांची नियुक्ती केली होती. माझ्यातील कलाकाराला हिराबाई यांनी मैफिलीचा रस्ता दाखविला.
गानहिरा हिराबाई बडोदेकर यांच्या स्वरमंचावरील गायनाने महिलांच्या प्रस्तुतीकरणाचा श्रीगणेशा झाला. एक महिला गायन करताना महिलांनी हे गाणं ऐकावं यासाठी रसिकांना आवाहन त्यांना करावे लागले. संगीताला मान नव्हता त्या काळात त्यांनी संगीत प्रसारासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्या बळावर माझ्यासारख्या कलाकाराची वाट सुकर झाली. हा वारसा त्यांनी आमच्यापर्यंत पोहोचविला. त्यांचे ऋण आहेत की त्यामुळे आम्हाला मान मिळतो आणि ताठ मानेने आमची गायनकला प्रस्तुत करू शकतो.
– पद्मा तळवलकर, ज्येष्ठ गायिका