महिला दिनी रेल्वेतील महिलांच्या कर्तृत्वाला सलाम

पुणे-मुंबई दरम्यान रोजचा प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची सर्वात लाडकी आणि पुणे रेल्वेची महत्त्वाची गाडी असलेली डेक्कन क्वीन अर्थात दख्खनची राणी शुक्रवारी खऱ्या अर्थाने महाराणी झाली. कारण या गाडीची धुरा महिलांकडे सोपविण्यात आली होती. सर्वच क्षेत्रांसह रेल्वेतही महिला कार्यरत असून, त्यांच्या कर्तृत्वाला सलाम म्हणून महिला दिनाच्या निमित्ताने हा विशेष उपक्रम राबविण्यात आला.

रेल्वेमध्ये चालकापासून सुरक्षा यंत्रणा ते तांत्रिक कामांमध्ये महिला कार्यरत आहेत. मात्र, संपूर्ण गाडीची जबाबदारी महिलांकडे दिली जात नाही. कोणत्या त्या कोणत्या ठिकाणी पुरुष कर्मचारी असतात. सर्वाच्या लाडक्या डेक्कन क्वीनमध्येही अनेकदा महिला कर्मचारी असतात. पण, महिला दिनाच्या निमित्ताने संपूर्ण गाडीची जबाबदारी महिलांकडेच सोपविण्यात आली होती. अगदी गाडीला इंजिन किंवा डबे जोडण्यापासून तिचे सारथ्य करण्यापर्यंतची जबाबदारी महिलांकडे होती. त्या निमित्ताने पुणे रेल्वे स्थानकावर सकाळी सर्व महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. महिला प्रवाशांना गुलाबपुष्प देण्यात आले.  रेल्वे प्रशासनासह रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षां शहा यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले.

डेक्कन क्वीनचे सारथ्य लोको पायलट श्रद्धा तांबे आणि जयश्री कांबळे यांनी केले. राधा चलवादी या गाडीच्या गार्ड होत्या. पॉइंट उमेन नम्रता धोंद्रे, सरिता ओव्हाळ, गुड्डी मीना यांनी योग्य पद्धतीने गाडी पॉइंटला जोडून घेतली. रेल्वे सुरक्षा दलाच्या त्रिशुला सळवे, सरला बर्डे, माधुरी गायकवाड यांनी गाडी सुटण्यापूर्वी आणि प्रवासात सुरक्षा व्यवस्थेचे नियोजन सांभाळले. महिलांच्या योग्य नियोजनात डेक्कन क्वीनचा प्रवास सुखरूप झाला. महिलाही दिलेली जबाबदारी यशस्वीपणेच नव्हे, तर उत्तमपणे पेलू शकतात, हेच या कर्तृत्ववान महिलांनी दाखवून दिले. विशेष म्हणजे शुक्रवारी अनेक दिवसांतून डेक्कन क्वीन सकाळी फलाट क्रमांक एकवर लावण्यात आली होती. ८८ वर्षांतील तिची ही जागा रेल्वे प्रशासनाने कायम ठेवावी, अशी मागणी हर्षां शहा यांनी केली.

Story img Loader