पुणे : पुणे महापालिकेतील आरोग्य निरीक्षक, तसेच मुकादमाने सफाई कर्मचारी महिलेचा लैंगिक छळ केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात आरोग्य निरीक्षकासह मुकादमाविरुद्ध विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोग्य निरीक्षक दिनेश सोनावणे (वय ४०), मुकादम रोहिदास फुंदे (वय ५०, रा. चव्हाणनगर, धनकवडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ३५ वर्षीय सफाई कर्मचारी महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा >>> शिकाऊ वाहन परवाना प्रक्रियेत आरटीओकडून बदल; आता काय होणार?

पीडित महिला महापालिकेत सफाई कर्मचारी आहे. महिला एका आरोग्य कोठीत नियुक्तीस आहे. फुंदे कोठीचा मुकादम आहे. या विभागात सोनवणे आरोग्य निरीक्षक आहे. सफाई कर्मचारी महिलेने काही कारणास्तव बदली कामगाराकडे सफाईचे काम दिले होते. त्याबदल्यात ती बदली कामगाराला पैसे देत होती. फुंदेने याबाबत महिलेकडे विचारणा केली. तुम्ही बदली कामगार का लावला? त्याला दरमहा पैसे का देतात? साहेबांना खुश केल्यास बसून पगार घ्याल, असे फुंदेने महिलेला सांगितले. त्यानंतर त्याने अश्लील वर्तन करण्यास सुरुवात केली. कामावरून घरी गेल्यानंतर फुंदेने महिलेच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. साहेबांना खुश करा, असे त्याने महिलेला सांगितले. त्यानंतर फुंदेने आरोग्य निरीक्षक सोनवणे यांच्याशी संपर्क साधला. सोनवणे यांनी महिलेशी अश्लील संभाषण केले. महिलेने याप्रकाराची माहिती कुटुंबीयांना दिली. अश्लील शेरेबाजी आणि कृत्यामुळे घाबरलेल्या महिलेने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार नोंदविली. पोलीस उपनिरीक्षक रेश्मा साळुंके तपास करत आहेत.

Story img Loader