पुणे : स्वारगेट बस स्थानकातील बलात्कार प्रकरणानंतर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) त्रिसदस्यीय समितीने केलेल्या सुरक्षाविषयक लेखापरीक्षणामध्ये जिल्ह्यातील १४ आगारांमधील ४२ बस स्थानकांमध्ये महिला सुरक्षारक्षक नेमणे बंधनकारक करण्याची शिफारस केली आहे. सध्या या बस स्थानकांमध्ये एकही महिला सुरक्षारक्षक नसल्याने प्रमुख बस स्थानकांमध्ये प्रत्येकी सहा आणि अन्य बस स्थानकांत दोन ते तीन महिला सुरक्षारक्षक नेमण्याचे या अहवालात सुचविण्यात आले आहे.
राज्य सरकारच्या निर्देशानुसार पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागातील ‘एसटी’ महामंडळाच्या १४ आगारांमधील ४२ बस स्थानकांचे सुरक्षाविषयक लेखापरीक्षण करण्यात आले असून, संबंधित अहवाल ४ मार्च रोजी राज्य सरकारकडे पाठविण्यात आला. या अहवालात स्वारगेट, वाकडेवाडी आणि बारामती या प्रमुख स्थानकांमध्ये सुरक्षायंत्रणेत अभाव असल्याचे स्पष्ट करण्यात आले. स्वारगेट आणि वाकडेवाडी या वर्दळीच्या बस स्थानकांमध्ये केवळ प्रत्येकी २३ सुरक्षारक्षक आणि २४ सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, तर बारामती शहरातील बस स्थानकात ४२ सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. उर्वरित ग्रामीण भागातील प्रत्येक बस स्थानकामध्ये आठ सीसीटीव्ही यंत्रणा असून, ती वाढविण्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील ४२ स्थानकांमध्ये १८० सुरक्षारक्षक आहेत. हे सुरक्षारक्षक खासगी एजन्सीद्वारे नेमण्यात आले असून, त्यामध्ये एकही महिला सुरक्षारक्षक नाही. त्यामुळे प्रत्येक बस स्थानकात महिला सुरक्षारक्षक नेमाव्यात. प्रमुख बस स्थानकांमध्ये प्रत्येकी सहा आणि इतर बस स्थानकांत दोन ते तीन महिला सुरक्षारक्षकांची नेमणूक करणे बंधनकारक करावे, अशी शिफारसही करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ४२ बस स्थानकांत ४० सीसीटीव्ही, ४० अतिरिक्त सुरक्षारक्षक आणि सुरक्षाभिंती वाढविण्याबाबतच्या शिफारशीही करण्यात आल्या आहेत.
‘सुरक्षा भिंतींची उंची वाढवावी’
ग्रामीण भागातील नारायणगाव, इंदापूर, भोर, दौंड, बारामती, एमआयडीसी शिरूर, वल्लभनगर, मंचर, राजगुरूनगर, तळेगाव दाभाडे आणि सासवड या आगारांत ३५ हून अधिक बस स्थानके आहेत. त्यांपैकी अनेक बस स्थानकांमध्ये सुरक्षाभिंतींची दुरवस्था झाली असल्याचे तपासणी आढळून आले आहे. अनेक सुरक्षाभिंतीची उंची अपेक्षापेक्षा कमी आहे. त्यामुळे स्थानकात भटक्या कुत्र्यांचा, प्राण्यांचा वावर जास्त असून, प्रवाशांचे सामान चोरी होण्यासारख्या घटना घडत असतात. बस स्थानक परिसरात खासगी प्रवासी वाहनांची वाहतूक होत असते, त्यामुळे अपघात होण्याची संभावना नाकारता येत नाही. त्यामुळे सुरक्षा भिंतींची उंची वाढवून वेळोवेळी दुरुस्ती आणि देखभाल व्हावी, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
सुरक्षाविषयक लेखापरीक्षण अहवालानुसार अनेक प्रमुख बस स्थानकांमध्ये सीसीटीव्ही आणि सुरक्षारक्षकांची संख्या अपेक्षेपेक्षा कमी असल्याने ही यंत्रणा वाढविण्याबाबतच्या शिफारशी करण्यात आल्या आहेत. बस स्थानकांतील प्रवाशांच्या वर्दळीनुसार सुरक्षेच्या उपाययोजना केल्या जात आहेत. राज्य सरकारकडून मंजुरी मिळताच तातडीने सुरक्षा वाढविण्यासंदर्भातील कार्यवाही करण्यात येईल. – प्रमोद नेहूल, विभाग नियंत्रक, ‘एसटी’महामंडळ, पुणे