पुणे शहर हे विद्येचं माहेर घर म्हणून ओळखलं जातं. परंतु याच शहरात २७ वर्षीय शिक्षिकेचा तिच्या सोबत काम करणार्या शिक्षकाकडून विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असून आरोपी विकास पवार विरोधात भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित शिक्षिकेकडे १२ वीचे पेपर तपासण्यासाठी होते. त्यावेळी त्यांना काही अडचणी आल्यास, त्या आरोपी विकास पवार यांना फोन करीत असत, त्यातून त्यांची चांगली मैत्री झाली.
त्याच दरम्यान आता शेवटचा पेपर तपासून झाला असल्याने, काल सोमवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास आरोपी विकास पवार पीडित महिलेला म्हणाला की,आपण लस्सी पिण्यास जाऊ,त्यावर त्यांनी होकार दिला.
कात्रज येथील एका ठिकाणी लस्सी पिण्यास गेले होते, तेव्हा आरोपी विकास पवार याने पीडित महिलेचा हात पकडल्याची घटना घडली. या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार विकास पवारच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.