फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य रविंद्रसिंह परदेशी यांनी पाठविलेल्या ज्या पत्रामुळे बुधवारी दिवसभर महाविद्यालयाचा राजकीय आखाडा बनला, ते पत्र मागे घेत असल्याचे महाविद्यालयाकडून पुणे पोलिसांना कळविण्यात आले आहे. पत्र मागे घेत असल्याचे नवे पत्र पोलिसांना पाठविण्यात आले आहे.
फर्ग्युसन महाविद्यालयात मंगळवारी कन्हैया कुमारच्या समर्थनार्थ झालेल्या घोषणाबाजीनंतर प्राचार्यांनी पोलिसांना पाठविलेल्या एका पत्रामुळे बुधवारी नव्याच चर्चेला तोंड फुटले. महाविद्यालयात देशविरोधी घोषणा दिल्या आहेत का, याचा तपास करावा, असे पत्र प्राचार्य रविंद्रसिंह परदेशी यांनी पुणे पोलिसांना लिहिले होते. या पत्राचे वृत्त वृत्तवाहिन्यांवर प्रसारित होऊ लागल्यावर लगेचच प्राचार्यांनी त्या पत्रामध्ये टायपिंग करताना चूक झाल्याचे स्पष्टीकरण दिले. देशविरोधी घोषणा दिल्या असल्यास तपास करावा, असे पत्रामध्ये म्हणायचे होते. पण टाईप करताना ‘असल्यास’ शब्द राहून गेल्यामुळे त्या वाक्याचा अर्थ बदलला असल्याचे महाविद्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर महाविद्यालयाकडून सुधारित पत्र पाठविण्यात आले. या पत्रांमुळे विविध विद्यार्थी आणि राजकीय संघटनांनी बुधवारी परदेशी यांना घेराव घालत त्यांच्याकडे जाब विचारला होता. विधानभवनामध्येही या पत्राचे पडसाद उमटले होते. परदेशी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी विरोधकांनी केली. या सर्व पार्श्वभूमीवर महाविद्यालयाकडून ही दोन्हीही पत्रे मागे घेत असल्याचे नवे पत्र पोलिसांना पाठविण्यात आले आहे.

Story img Loader