पुणे: पाच वर्षांखालील मुलांमध्ये जास्त तापामध्ये फिट येण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. अशा प्रकरणांमध्ये पालकांनी घाबरून न जाता मुलांकडे वेळीच लक्ष देणे गरजचे आहे. मुलांवर त्वरित प्रथमोपचार करून वैद्यकीय सल्ल्याने औषधोपचार करणे आवश्यक आहे, अशी सूचना तज्ज्ञांनी केली आहे.
फिटची समस्या ही केवळ प्रौढांमध्येच नाही तर लहान मुलांमध्येही दिसून येते. अचानक ताप वाढल्यावर येणारी फिट आधी लक्षणे आढळून आलेली नाहीत अशांनाही उद्भवू शकते. लहान मुलांवर त्यांचा सर्वाधिक परिणाम होतो. पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना अशा प्रकारच्या फिट अनेकदा संसर्गामुळे येतात. त्या सुमारे पाच मिनिटांपर्यंत टिकू शकतात. कानाचा संसर्ग, सर्दी आणि फ्ल्यूमुळेही फिट येऊ शकतात.
हेही वाचा… सावधान! हृदयविकाराचा धोका आता कमी वयात वाढतोय
मुलाच्या शरीराच्या दोन्ही बाजूंचे स्नायू एकाच वेळी अचानक आकुंचन पावणे, मुलांचे रडणे, सरळ उभे राहिल्यास शारिरीक समतोल न राखता येणे ही याची लक्षणे आहेत. उलट्या होणे आणि जीभ चावणे, संवेदनशीलता नष्ट होणे अशी लक्षणेही आढळून येतात. दर महिन्याला अशी तीन ते चार प्रकरणे उपचारासाठी येत आहेत. पाच वर्षांखालील मुलांमध्ये याचे प्रमाण चार ते पाच टक्के आहे, अशी माहिती बालरोजतज्ज्ञ डॉ. जगदीश काथवटे यांनी दिली.
हेही वाचा… प्रसिद्ध संगीतकार-गायक किशोर कुलकर्णी यांचे निधन
फिट या सौम्य अथवा गंभीर प्रकारच्या असतात. सौम्य तापाचे झटके हे सर्वांत प्रचलित प्रकार आहेत. मुलांना लसीकरणानंतर अशी स्थिती उद्भवण्याची शक्यता असते. एकूण लोकसंख्येत दोन ते चार टक्के जणांना तापामुळे फिट येण्याचा धोका असतो. साधारणत: मागील दोन महिन्यांपासून दर आठवड्याला दोन ते तीन रुग्ण उपचारासाठी येत आहेत, असे बालरोगतज्ज्ञ डॉ. इरफान पल्ला यांनी सांगितले.
मुलांना फिट आल्यानंतर काय कराल…
- मुलांच्या हालचाली थांबवण्याचा प्रयत्न करू नका
- त्यांना जमिनीवर सुरक्षित ठिकाणी ठेवा
- मुलांचे कपडे घट्ट असतील तर ते सैल करा
- त्यांच्या गळ्याभोवतीची जागा मोकळी ठेवा
- मुलाला उलट्या होत असतील तर कुशीवर किंवा पोटावर झोपवा
- डॉक्टरांशी संपर्क साधून औषधे घ्या