तीन लाख सदस्यनोंदणीचे उद्दिष्ट असूनही रडतखडत नोंदणी सुरू असलेल्या पिंपरी भाजपमध्ये प्रदेश संघटन सरचिटणीस रवींद्र भुसारी यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत सर्वाचीच हजेरी घेतली.
पक्षाच्या खराळवाडी येथील बैठकीत भुसारी यांच्या उपस्थितीत प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. शहराध्यक्ष सदाशिव खाडे, संघटनमंत्री रवी अनासपुरे यांच्यासह अमोल थोरात, राजू दुर्गे, एकनाथ पवार, प्रमोद निसळ, उमा खापरे, शैला मोळक, मोरेश्वर शेडगे, सारंग कामतेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत सदस्यनोंदणीचा आढावा घेण्यात आला. सदस्यनोंदणीसाठी मोठमोठे दावे करणाऱ्या पदाधिकाऱ्यांकडून प्रत्यक्षात काहीच नोंदणी झाली नसल्याच्या, तसेच नोंदणीपुस्तके जमा झाल्या नसल्याच्या तक्रारी होत्या, त्याची दखल बैठकीत घेण्यात आली. शहराध्यक्षांनी प्रत्येकाकडील नोंदणीची माहिती विचारली, तेव्हा उद्दिष्टाच्या तुलनेत खूपच कमी नोंदणी झाल्याचे उघड झाले. त्यानंतर, नोंदणी मुदतीत पूर्ण करण्याचे आदेश सर्वाना देण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fiasco of registration of bjp membership