पुणे : समाजमाध्यमावरील ओळखीतून सिंहगड रस्ता भागातील ज्येष्ठ महिलेची सायबर चोरट्यांनी ५७ लाख ७९ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. सायबर चोरट्यांनी परदेशातून ज्येष्ठ महिलेला दोन कोटी रुपये पाठविण्याचे आमिष दाखविले होते. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ज्येष्ठ महिला सिंहगड रस्ता परिसरात राहायला आहेत. ज्येष्ठ महिलेच्या मोबाइल क्रमांकावर सायबर चोरट्यांनी संपर्क साधला होता. त्या वेळी एका चोरट्याने त्याचे नाव एरिक ब्राऊन असे सांगितले होते. परदेशात वास्तव्यास असल्याची बतावणी चोरट्यांनी केली होती. ज्येष्ठ महिलेला परदेशातून दोन कोटी रुपये भेट म्हणून पाठविण्यात येणार असल्याचे आमिष चोरट्यांनी दाखविले होते.

त्यानंतर ज्येष्ठ महिलेच्या मोबाइल क्रमांकावर आशा कुमारी नावाच्या महिलेने संपर्क साधला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियातून बोलत असल्याची बतावणी तिने केली. रिझर्व्ह बँकेशी साधर्म्य असलेला ईमेल महिलेला पाठविण्यात आला. ज्येष्ठ महिलेला आमिष दाखवून तिला वेळोवेळी ५७ लाख ७९ हजार ३०० रुपये बँक खात्यात जमा करण्यास सांगितले.दरम्यान, महिलेला दोन कोटी रुपयांची रक्कम पाठविण्यात आली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. त्यानंतर या प्रकरणी गु्न्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे तपास करत आहेत.

हेही वाचा : पुणे : सहकारनगर भागात अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यास गुन्हे शाखेकडून अटक

आमिषाचे जाळे

गेल्या काही वर्षांपासून समाजमाध्यमातून अनोळखी व्यक्तीशी झालेल्या मैत्रीतून फसवणूक करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. अनोळखी व्यक्तीने मैत्रीची विनंती पाठविल्यानंतर त्याला प्रतिसाद देऊ नका, असे आवाहन पोलिसांनी वेळोवेळी केले आहे. पोलिसांनी दिलेल्या सूचनांकडे काणाडोळा करुन अनेकजण आमिषांना बळी पडत आहेत.

Story img Loader