पिंपरी : आगामी विधानसभा निवडणुकीत पिंपरी-चिंचवड शहरावर पुन्हा वर्चस्व निर्माण करण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची धावपळ सुरू झाली आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांना पक्षात घेतल्यानंतर आता भाजपमधील नाराजांना पक्षात आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रयत्न सुरू असून, शनिवारी (२० जुलै) विजयी संकल्प मेळाव्यातून शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. पक्षातील पडझड रोखणे, नाराजांना थोपविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार रविवारी (२१ जुलै) मेळावा घेणार आहेत. त्यामुळे आगामी काळात दोन्ही ‘राष्ट्रवादीं’त वर्चस्वासाठी संघर्षाची चिन्हे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पिंपरी-चिंचवड शहर एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. परंतु, दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे यांनी अजित पवारांची साथ सोडून कमळ हातात घेतले आणि तो उद्ध्वस्त केला. महापालिकेत भाजपची सत्ता आणली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शहरातील पक्ष संघटना, माजी नगरसेवकांनी अजित पवारांबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. परंतु, लोकसभा निवडणुकीतील निराशाजनक कामगिरीनंतर पक्षात गळती सुरू झाली. शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी समर्थक माजी नगरसेवकांसह शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. शनिवारी पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या विजयी संकल्प मेळाव्यात राष्ट्रवादीसह भाजपमधील काही माजी नगरसेवक पवार गटात प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात आले. भोसरीतील प्रवेश झाले; आता पिंपरी आणि चिंचवडमधील प्रवेशही लवकरच होतील, असा दावा शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी केला. त्यामुळे पवार गटाने नाराजांना पक्षात ओढण्यावर भर दिल्याचे दिसत आहे.

हे ही वाचा… पूजा खेडकर यांना पुणे पोलिसांकडून पुन्हा समन्स

शहराध्यक्षांनी पक्ष सोडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांची पुण्यात बैठक घेतली. गव्हाणे यांना खूप समजावले. पण, त्यांनी ऐकले नाही. मला विधानसभा लढायची असल्याचे सांगून त्यांनी माझ्याकडे राजीनामा दिला. मी त्यांना पाठविले नाही. गैरसमज करून घेऊ नका. पक्षाची पुढील वाटचाल, कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी रविवारी (२१ जुलै) शहरात येईन, असे पवार यांनी सांगितले. काळेवाडीत सकाळी सात ते दहा या वेळेत कार्यकर्त्यांची मते ऐकल्यानंतर पक्षाचा मेळावा होणार आहे.

हे ही वाचा… पिंपरी-चिंचवड: हवेत पिस्तूल उंचावून रिल्स बनवणाऱ्यांना बेड्या; स्टंटबाजी करणं पडलं महागात

दरम्यान, माजी आमदार विलास लांडे यांच्यासह भोसरीतील तीन माजी नगरसेवकही बैठकीला उपस्थित होते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fight among both ncp for supremacy in pimpri chinchwad pune print news ggy 03 asj
Show comments