लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : लहान मुलांची खेळताना भांडणे झाल्याने दोन कुटुंबात हाणामारी झाल्याची घटना नगर रस्त्यावरील आव्हाळवाडी परिसरात घडली. या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात दोन्ही कुटुंबाकडून परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या असून १५ जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आणखी वाचा- पुणे- वसंत मोरेंच्या मुलाला जीवे मरण्याची धमकी
सचिन प्रभाकर आव्हाळे (वय ३८, रा. आव्हाळवाडी, ता. हवेली, जि. पुणे) यांनी याबाबत लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आदित्य दादासाहेब आव्हाळे, महेश संभाजी कुटे, कौशल कैलास आव्हाळे, सिद्धांत प्रवीण आव्हाळे, कैलास किसन आव्हाळे, दादासाहेब गोविंद आव्हाळे, मंदाकिनी दादासाहेब आव्हाळे, आदिती दादासाहेब आव्हाळे, सुवर्णा प्रवीण आव्हाळे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी सचिन आव्हाळे यांचा मुलगा स्वराज (वय ११) आणि हर्षद प्रदीप आव्हाळे (वय १०) यांच्यात खेळताना झालेल्या भांडणातून आरोपींनी सचिन यांच्या मोटारीवर दगड मारले. दांडके आणि कोयत्याने सचिन यांना जीवे मारण्याची धमकी देऊन मारहाण केली. सचिन यांची आई शारदा यांच्या डोक्यात कोयता मारला तसेच सचिन यांच्या वडिलांना गजाने मारहाण केल्याचे सचिन यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
आणखी वाचा- अन्नातून विषारी ओैषध; श्वानाच्या तीन पिलांचा मृत्यू; वारजे भागतील घटना
दरम्यान, प्रवीण विठ्ठल आव्हाळे (वय ४०, रा. कॅनेरा बँकेजवळ, आव्हाळवाडी, ता. हवेली, जि. पुणे) यांनी परस्पर विरोधी फिर्याद दिली आहे. या प्रकरणी सचिन पिराजी आव्हाळे, नामदेव पिराजी आव्हाळे, पल्लवी सचिन आव्हाळे, नामदेव पिराजी आव्हाळे यांच्या पत्नीच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रवीण यांचा मुलगा वेदांत आणि आरोपी सचिन यांचा मुलगा स्वराज यांच्यात किरकोळ कारणावरुन वाद झाला. त्यानंतर आरोपी सचिन आणि कुटुंबीयांनी प्रवीण यांचे वडील विठ्ठल, वहिनी, भाऊ दादासाहेब, पुतण्या आदित्य आणि वेदांत यांना गजाने मारहाण केल्याचे प्रवीण यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस उपनिरीक्षक कोळपे आणि लिंगे तपास करत आहेत.