आमदार विलास लांडे म्हणजे भोसरीचे अघोषित सर्वेसर्वा आणि त्यांचे भाचेजावई नगरसेवक महेश ‘दादा’ लांडगे म्हणजे ‘उद्याचे नेतृत्व’. या दोघांमधील संघर्ष आधी ‘नुरा कुस्ती’ वाटायचा, प्रत्यक्षात तसे नसून त्यांच्यातून विस्तवही जात नाही. २००२ च्या पालिका निवडणुकीत दोघांमध्ये काहीतरी ठरले, एकाने पलटी घेतली व दुसऱ्याची फसवणूक झाली, त्यातून सुरू झालेला संघर्ष ११ वर्षांनंतरही कायम आहे. नुकत्याच पार पडलेल्या ‘महाराष्ट्र केसरी’ च्या आखाडय़ातही त्याचे पडसाद उमटले. पै-पाहुण्यांमधील हा वाद मिटवण्याचे बरेच प्रयत्न फोल ठरले. त्यांच्यातील अस्तित्वाची व वर्चस्वाची लढाई सुरू झाल्याने दोन्हीकडील नातेवाईक, मित्रमंडळी, कार्यकर्त्यांची फरफट होते आहे.
क्रीडाप्रेमी भोसरीत पैलवानांच्या आखाडय़ात राजकीय कुस्त्यांचे फड लागल्याने ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धा राज्यभर गाजल्या. यानिमित्ताने राष्ट्रवादीचे अंतर्गत राजकारण चव्हाटय़ावर आले व लांडे-लांडगे यांच्यातील संभाव्य ‘राजकीय’ कुस्तीच्या चर्चा गावोगावी सुरू झाल्या. भोसरी म्हणजे पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकारणाचे मुख्य केंद्र. आतापर्यंत सर्वाधिक महत्त्वाची पदे भोसरीला मिळाली. लांडे भोसरीचे आमदार व त्यांची पत्नी मोहिनी लांडे महापौर आहेत. यापूर्वीच्या भोसरीकर लाभार्थ्यांची यादी मोठी आहे. त्यात महेश लांडगे यांचे नाव नाही, हेच या संघर्षांचे मूळ आहे. स्थायी समितीचे अध्यक्षपद, महापौरपद संधी असूनही मिळाले नाही, त्यास लांडे यांची ‘कूटनीती’ कारणीभूत असल्याचा महेश लांडगेंचा संशय आहे. त्यामुळे त्यांनी आमदारांना आव्हान दिले. नातेसंबंध असल्याने ते एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवतील का, लांडगे यांना एखादे मोठे पद मिळाल्यास हा वाद मिटेल का, अशा अनेक शक्यता व्यक्त होतात. मात्र, प्रकरण समेटापलीकडे गेले आहे. लांडगे समर्थक फलकबाजी करतात, लांडेंना उद्देशून आव्हानात्मक शेरेबाजी करतात. तथापि, धूर्त लांडे संधीच्या शोधात आहेत. कुस्त्यांच्या आखाडय़ात अजितदादा व आबा आले, त्यांनी तापलेल्या वातावरणात भडका उडेल, अशी भाषणबाजी टाळून स्वत:चा कल गुलदस्त्यात ठेवला. ‘साहेबां’ची गैरहजेरी मात्र सूचक होती.
विलास लांडे ‘शिरूर’ च्या िरगणात लढण्यास उत्सुक नसल्याने भोसरीचे प्रबळ दावेदार राहतील. त्यामुळे आमदारकीवरून संघर्ष अटळ आहे. दोघांची भांडणे लावून ‘तमाशा’ पाहण्याचा, आपली पोळी भाजून घेण्याचा अनेकांचा प्रयत्न आहे, त्यात विरोधकांपेक्षा राष्ट्रवादीचे नेतेच आघाडीवर आहेत. ‘पूर्वपुण्याई’ मुळे लांडे यांचे बाजारात अनेक ‘हितचिंतक’ असून, त्यांची कृपादृष्टी लांडगे यांच्यावर आहे. लांडगे यांना मोठे करण्याची त्यांची बिलकूल इच्छा नसून काटय़ाने काटा काढून लांडे यांना घरी बसवण्याचा डाव आहे. लांडे तेल लावलेले पहिलवान आहेत, हे त्यांना ओळखणारे ठामपणे सांगतात. लांडगे यांचे पाठबळ दिवसेंदिवस वाढते आहे, हे तितकेच खरे आहे. शक्ती-युक्तीचे हे भोसरी मॉडेल एकमेकांशी झुंजणे राष्ट्रवादीला परवडणारे नाही. त्यांच्यातील संघर्ष पेटता ठेवायचा की मनोमीलन घडवून वादाचा सोक्षमोक्ष लावायचा, याचा रामबाण उपाय पवारांकडे असून ते त्याचा वापर ‘सोयी’ नुसार ठरवतील, असेच दिसते.
लढाई.. वर्चस्वाची अन् फरफट पै-पाहुण्यांची!
‘पूर्वपुण्याई’ मुळे लांडे यांचे बाजारात अनेक ‘हितचिंतक’ असून, त्यांची कृपादृष्टी लांडगे यांच्यावर आहे. लांडगे यांना मोठे करण्याची त्यांची बिलकूल इच्छा नसून काटय़ाने काटा काढून लांडे यांना घरी बसवण्याचा डाव आहे.
Written by लोकसत्ता टीम
Updated:
आणखी वाचा
First published on: 17-12-2013 at 02:39 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fight between vilas lande and mahesh landge becoming inconvinience for activists