पुणे: हवेली तालुक्यातील कोलवडी परिसरात आयोजित करण्यात आलेल्या छटपूजेच्या कार्यक्रमात फटाके फोडण्याच्या वादातून दहशत माजविल्या प्रकरणी सहा जणांच्या विरोधात लोणीकंद पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली. या प्रकरणी चिराग अजय तिवारी (वय १९), नागनाथ पाटील (वय २२), सागर अशोक जावळे (वय २०), अमीन चांद शेख ( वय १८), महेश इंगळेश्वर (वय २३) आणि स्वप्नील जाधव (वय १९, सर्व रा. कोलवडी, ता. हवेली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिवारी, जावळे आणि शेख याच्या विरोधात गुन्हे दाखल आहे. याबाबत नीतेश बलिस्टर प्रसाद (रा. कोलवडी) यांनी लाेणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हेही वाचा >>> पुणे : भरधाव बसच्या धडकेने पादचारी मृत्युमुखी; नगर रस्त्यावर अपघात
प्रसाद आणि सहकाऱ्यांनी सोमवारी (३१ ऑक्टोबर) कोलवडी गावातील श्री अंगण काॅलनी परिसरात छटपूजा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या वेळी फटाके फोडण्यावरून वाद झाला. आरोपींनी नीतेश आणि सहकाऱ्यांना शिवीगाळ केली. आरोपींनी प्रतीक कदम याला दांडक्याने मारहाण करून दहशत माजविली. आरोपी तिवारी, जावळे, शेख सराईत गुन्हेगार असून, त्यांना अटक करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करत आहेत.