पुणे : गणेशोत्सवासाठी वर्गणी न दिल्याने तिघांनी तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारातील सेवक वसाहतीत घडली. याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. दिनेश वाल्मिकी (वय ३०), प्रतिक मल्हारी (वय २३, रा. दोघे रा. विद्यापीठ सेवक वसाहत), उमेश (वय २५, रा. चिखलवाडी, ओैंध) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत कृष्णा किशोर तांबोळी (वय ३५, रा. विद्यापीठ सेवक वसाहत) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हेही वाचा >>> आता तृतीयपंथी फोडणार दहीहंडी, देशातील पहिल्या चार गोविंदा पथकांची पुणे-पिंपरीत स्थापना
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तांबोळी आणि आरोपी वाल्मिकी, मल्हारी विद्यापीठाच्या आवारातील सेवक वसाहतीत राहायला आहेत. वाल्मिकी आणि मल्हारी यांनी तांबोळी यांच्याकडे गणेशोत्सवासाठी वर्गणीची मागणी केली. त्यावेळी तांबोळी यांनी वर्गणी देण्यास नकार दिला. सेवक वसाहतीतील मोठ्या मंडळाला वर्गणी दिली असल्याचे तांबोळी यांनी सांगितले. या कारणावरुन त्यांच्यात वाद झाला. वाल्मिकी, मल्हारी आणि साथीदारांनी तांबोळींना बांबूने बेदम मारहाण केली. पोलीस नाईक रायकर तपास करत आहेत.