पुणे : मागील काही दिवसांपूर्वी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याची घटना घडली. यावरून राज्यातील राजकारण तापले असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप पाहण्यास मिळत आहे. त्याच दरम्यान पुण्यातील डेक्कन पोलीस स्थानकात महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तक्रारी अर्जाद्वारे केली. यावेळी युवक क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष कुमार सप्तर्षी, अ‍ॅड. असीम सरोदे, अन्वर राजन हेदेखील उपस्थित होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तुषार गांधी म्हणाले की, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल संभाजी भिडे यांनी यापूर्वी अनेक वेळा वादग्रस्त विधाने केली आहेत. महात्मा गांधी यांच्याबद्दलदेखील विधान केले. पण आता महात्मा गांधी यांच्या आईबद्दल केलेले विधान ऐकल्यावर खूप दुःख झाले आहे. त्यानंतर राज्यातील अनेक पोलीस ठाण्यांमध्ये संभाजी भिडेंविरोधात गुन्हे दाखल झाले. या प्रकरणी कडक पावलं उचलू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिले आहे.

हेही वाचा – पुणे: गणेश मंडळांत ‘मानपमान ’नाट्य! आज पुन्हा बैठक

हेही वाचा – पुणे: उरुळी देवाची-फुरसुंगी नगर परिषदेचे भवितव्य अधांतरी?

संभाजी भिडे यांच्या विधानाला महिनाभराचा कालावधी होऊन गेला. विधानसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाईचे आश्वासन देऊन साधारणपणे १५ दिवसांचा कालावधी झाला आहे. तरीदेखील कोणत्याही प्रकारची कार्यवाही होताना दिसत नाही. संभाजी भिडे यांच्या विरोधात वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून कारवाई करावी. अन्यथा आम्ही न्यायालयामध्ये धाव घेणार असल्याचा इशारा तुषार गांधी यांनी दिला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: File a case against sambhaji bhide for making a controversial statement tushar gandhi complaint to the deccan police svk 88 ssb