पुणे : शहरातील प्रमुख चौकांत वाहनचालक, तसेच नागरिकांना अडवून पैसे मागणाऱ्या तृतीयपंथीय आणि भिक्षेकऱ्यांविरुद्ध कारवाईचा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला. धमकावून पैसे मागितल्याच्या तक्रारी आल्यास पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत, असे पोलीस आयुक्तांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
तृतीयपंथीय, तसेच भिक्षेकरी खासगी कार्यक्रम, विवाहाच्या ठिकाणी जाऊन पैसे मागतात. पैसे न दिल्यास संबंधितांना धमकावतात. शहरातील प्रमुख चौकांत वाहनचालकांना अडवून पैसे मागितले जातात. पैसे न दिल्यास मोटारीच्या काचा वाजवितात. अशा प्रकारच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या. नागरिकांना धमकावून कोणी पैसे मागत असल्याच्या तक्रारी आल्यास तृतीयपंथीय, भिक्षेकऱ्यांविरुद्ध खंडणी, बेकायदा जमाव, नागरिकांना त्रास होईल असे वर्तन करणे अशा कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
हेही वाचा – मतदार जागृतीच्या फलकावर ‘इन्कलाब जिंदाबाद’, ‘नोटा’; पुण्यातील गोखले संस्थेतील घटना
हेही वाचा – पिंपरी-चिंचवडकरांची वाहन खरेदीला पसंती, ‘इतक्या’ वाहनांची खरेदी
शहरातील प्रमुख चौक, खासगी कार्यक्रमात शिरून पैसे मागितल्याच्या तक्रारी आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. याबाबतचा आदेश शुक्रवारपासून (१२ एप्रिल) लागू करण्यात येणार आहे. याबाबत शहरातील सर्व पोलीस ठाण्यांतील वरिष्ठ निरीक्षकांना सूचना देण्यात आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.