खासदार सुप्रिया सुळे यांनी आज सासवड येथे येऊन पुरंदर तालुका आढावा बैठकीमध्ये तालुक्यातील टंचाईच्या परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष माणिक झेंडे, सुदामराव इंगळे, विजय कोलते, पुष्कराज जाधव, वामन कामठे, योगेश फडतरे, ॲड. गौरीताई कुंजीर, मनोहर जगताप आदी उपस्थित होते. पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी शासनावर कडाडून टीका केली.
कालच मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बीड जिल्ह्यामध्ये जे खून झाले आहेत त्या सर्व प्रकरणांच्या फाईल उघडल्या गेल्या पाहिजेत. त्याची स्वतंत्र चौकशी झाली पाहिजे ही मागणी केली आहे. धनंजय मुंडे यांनी जे व्यक्तव्य केले आहे त्याचा मी जाहीर निषेध केलेला आहे. त्यांनी नैतिकतेचा न पण वापरला नाही, त्यांच्या पक्षात काय चालले आहे हे त्यांनाच माहीत. सुरेश धस यांनी एक स्टेटमेंट केले आहे त्यामध्ये नैतिकता आणि धनंजय मुंडे यांची भेट झाली नाही हे दुर्दैव आहे असे म्हणले आहे. वाल्मीक कराडचे पीए धनंजय मुंडे यांना भेटायला गेले होते. यावरून त्यांचे नाते किती घट्ट आहे हे कळून येते. यांनाही सह आरोपी करा अशी आमची मागणी आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
पंकजा मुंडे यांनी त्या कुटुंबाची माफी मागितली आहे. त्यांनी सुसंस्कृतपणा दाखवला आहे. खंडणी झाली, खून, हिंसाचार, शेतकरी यांची फसवणूक झाली, अजून काही करायचे राहिले आहे का, कुठला गुन्हा राहिला आहे. यातील आरोपीला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते, ज्या गोष्टी बाहेर ऐकायला मिळतात त्या भयंकर आहेत, यामुळे महाराष्ट्र बदनाम होत आहे. लोकांनी यांना विश्वासाच्या नात्याने सत्ता दिली, पण तुम्ही कुठलाच गुन्हा सोडला नाही. व्हिडिओमधले फोटो पाहून त्यांच्या कुटुंबातील लोकांना काय वाटत असेल, किती यातना होत असतील. या विषयावर जनतेच्या भावना तीव्र आहेत न्याय मिळालाच पाहिजे, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
महायुती सरकारच्या काळात आंदोलन केल्याशिवाय काहीच मिळत नाही
पुणे महानगरपालिकेत ११३ जागा भरायच्या आहेत, यासाठी २७००० मुलांनी अर्ज केलेत. पैसे भरून घेतले आहेत. तरीसुद्धा जागा भरल्या का जात नाहीत हा प्रश्न मी विचारणार आहे, नाहीतर आंदोलन करावे लागेल. आंदोलनाशिवाय या सरकारच्या काळात काहीच मिळत नाही. असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. पुरंदर तालुका आढावा बैठकीमध्ये त्यांनी दाखल्यांचे प्रश्न, पुरंदर उपसा सिंचन योजनेतील अडचणी जाणून घेतल्या. पुणे जिल्ह्यात पहिला टँकर पुरंदर तालुक्यात सुरू झाला ही आपल्यासाठी चिंताजनक परिस्थिती असल्याचे त्यांनी सांगितले.