लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न अनेक महाविद्यालयांनी संचालक, प्राचार्य आणि प्राध्यापकांची पदे भरली नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. महाविद्यालयांनी तातडीने पदभरतीची कार्यवाही सुरू करावी अन्यथा संबंधित महाविद्यालयांची ऑनलाइन सेवा बंद करण्याचा; तसेच दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा विद्यापीठाने दिला आहे.

विद्यापीठाचे उपकुलसचिव एस. डी. डावखर यांनी याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार संलग्न महाविद्यालय आणि मान्यताप्राप्त परिसंस्था यांच्यामधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या विद्यापीठ आणि राज्य सरकारने निश्चित केल्याप्रमाणे असणे आवश्यक आहे. त्या त्या अभ्यास आणि पाठ्यक्रमासाठी अध्यापन, प्रशिक्षण त्याचप्रमाणे संशोधन यासाठी कार्यक्षमतेने योग्य ती तरतूद करण्यासाठी पुरेशा मनुष्यबळाची आवश्यकता आहे.

विद्यापीठाने दिलेल्या आदेशाचे पालन करणे प्रत्येक संलग्न महाविद्यालय आणि मान्यताप्राप्त परिसंस्थेवर बंधनकारक आहे. त्या अनुषंगाने पुणे, नाशिक आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांतील संलग्न महाविद्यालयांनी नियमित प्राचार्य, संचालक आणि प्राध्यापकांची पदे भरण्याची कार्यवाही करण्याबाबतचे परिपत्रक पत्रक ११ जून २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते. मात्र, त्याचे पालन अनेक महाविद्यालयांनी केले नसल्याचे अधिकार मंडळाच्या निदर्शनास आल्याचे नमूद करण्यात आले आहे.

विद्यापीठातील रिक्त पदांचे काय?

एकीकडे विद्यापीठाने संलग्न महाविद्यालयांना पदभरती करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, विद्यापीठातच कुलसचिव, अधिष्ठाता, परीक्षा व मूल्यमापन संचालक अशी महत्त्वाची पदे रिक्त आहेत. त्याशिवाय शैक्षणिक विभागांतही प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमुळे अतिरिक्त कार्यभाराने कामकाज करावे लागत आहे. त्यामुळे पदभरती न केल्यास कारवाईचा इशारा महाविद्यालयांना देताना विद्यापीठातील रिक्त पदे कधी भरली जाणार, असा प्रश्न शिक्षण क्षेत्रातून उपस्थित करण्यात येत आहे.

Story img Loader