पुणे : ‘देशाचे आणि समाजाचे चित्र नेमके कुठे बिघडले आहे, यावर मोकळेपणाने भाष्य करण्याचे सामर्थ्य व्यंगचित्रांमध्ये असते. व्यक्ती असो, की समाज, आज प्रत्येकालाच व्यंगचित्रांची गरज आहे,’ असे मत प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र अंधश्रद्धा समितीतर्फे आयोजित ‘विवेकरेषा’ व्यंगचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन मंजुळे यांंच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. प्रसिद्ध राजकीय-व्यंगचित्रकार मंजुल, लेखक अरविंद जगताप, प्रदर्शनाचे संयोजक व्यंगचित्रकार गौरव सर्जेराव आदी या वेळी उपस्थित होते. प्रदर्शनाच्या निमित्ताने व्यंगचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

मंजुळे म्हणाले, ‘व्यंगचित्रातून वास्तव अधिक स्पष्ट होते. कुरूप स्वरूपात स्वत:ला बघणे कोणालाही आवडत नाही. व्यंगचित्रे तुमच्यात नेमके काय कमी आहे, यावर बोट ठेवतात. ती बोलकी असतात. व्यंगचित्रांतून कोणताही पडदा, कोणताही ‘फिल्टर’ लावलेला नसतो. त्यामुळे ती प्रभावी ठरतात.’

‘व्यंगचित्रांच्या माध्यमातून चमत्काराला नमस्कार करणाऱ्यांना आम्ही प्रश्न विचारतो. अजैविक असल्याचा दावा करणाऱ्या नेत्यांवरही प्रश्न उपस्थित करतो. इतकी ताकद व्यंगचित्रांमध्ये असते,’ असे मंजुल म्हणाले.

‘व्यंगचित्रकार आणि राजकारणी यांच्यात मोकळेपणाने संवाद होऊ शकेल, असा काळ यायला हवा,’ अशी अपेक्षा जगताप यांनी व्यक्त केली. रूपाली आर्डे यांनी सूत्रसंचालन केले. मुक्ता दाभोलकर यांनी प्रास्ताविक केले.