भारतीय चित्रपटांची शताब्दी आणि जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ‘आयाम’, ‘आशय फिल्म क्लब’ यांच्यातर्फे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या सहकार्याने शुक्रवारपासून (८ मार्च) तीन दिवसांच्या स्त्रीकेंद्री चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या प्रेक्षागृहामध्ये ८ मार्च रोजी दुपारी चार वाजता प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर निष्ठा जैन दिग्दर्शित ‘गुलाबी गँग’ आणि नंदिता दास दिग्दर्शित ‘फिराक’ हे चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका गंगुबाई हनगल यांच्यावरील ‘गंगुबाई’ हा चित्रपट शनिवारी (९ मार्च) दुपारी बारा वाजता पाहता येईल. या चित्रपटाच्या दिग्दर्शिका प्रिया कृष्णस्वामी आणि प्रमुख भूमिका करणारी सरिता जोशी या प्रसंगी उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर गौरी शिंदे दिग्दर्शित श्रीदेवीची भूमिका असलेला ‘इंग्लिश िवग्लिश’ चित्रपट दाखविण्यात येणार आहे. चित्रपट समीक्षक दीपा गेहलोत यांना फिल्म सोसायटी चळवळीचे सुधीर नांदगावकर यांच्या हस्ते ‘वुमन फिल्म क्रिटिक अॅवॉर्ड’ प्रदान करण्यात येणार आहे.
राज्य सरकारच्या साहित्य पुरस्कारविजेत्या ‘सत्यजित राय आणि भारतीय मन्वंतर’ या पुस्तकाच्या लेखिका डॉ. श्यामला वनारसे यांचा रविवारी (१० मार्च) सकाळी दहा वाजता ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. त्यानंतर सुहासिनी मुळ्ये दिग्दर्शित ‘ब्रह्मवादिनी’ हा महिला पुरोहितांवरील लघुपट पाहता येईल. सोनाली बोस दिग्दर्शित कोंकणा सेन-शर्मा यांची भूमिका असलेला ‘अमू’, सई परांजपे दिग्दर्शित शबाना आझमी आणि नसिरुद्दीन शाह यांच्या भूमिका असलेला ‘स्पर्श’ या चित्रपटांनंतर, ‘द जॅपनीज वाईफ’ या चित्रपटाने महोत्सवाची सांगता होणार आहे.