भारतीय चित्रपट निर्मितीच्या शताब्दीनिमित्त महाराष्ट्र शासनातर्फे आठ शहरांमध्ये ‘चित्रपट महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यामध्ये ८ ते १४ मार्च या कालावधीत अलका टॉकिज येथे हा चित्रपट महोत्सव होणार आहे. महोत्सवामध्ये मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांतील चित्रपट दाखवले जाणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी पत्रकाद्वारे दिली.
महोत्सवातील चित्रपट प्रेक्षकांना विनामूल्य पाहता येणार असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाणार आहे. दररोज १२ ते ३, ३ ते ६, ६ ते ९ आणि ९ ते १२ असे ४ खेळ दाखवले जाणार आहेत. ‘ब्रह्मचारी’, ‘गुळाचा गणपती’, ‘मल्हारी मरतड’, ‘श्यामची आई’, ‘सांगत्ये ऐका’, ‘जोगवा’, ‘श्वास’, ‘गाभरीचा पाऊस’ यांसारखे मराठी आणि ‘मदर इंडिया’, ‘दो बिघा जमीन’, ‘जाने भी दो यारो’, ‘दो आँखे बारा हात’ आणि ‘अर्धसत्य’ यांसारखे हिंदी चित्रपट महोत्सवामध्ये दाखवण्यात येणार आहेत.
महोत्सवाचे उद्घाटन ८ मार्च रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते अलका टॉकिज येथे ११ वाजता होणार आहे. या वेळी दादासाहेब फाळके यांच्या जीवनावर आधारित माहितीपट दाखवण्यात येणार आहे. उद्घाटनप्रसंगी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, सांस्कृतिक मंत्री संजय देवताळे, सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री फौजिया खान आणि पुण्यातील संसद सदस्य, विधिमंडळ सदस्य आदी उपस्थित असतील.