पिंपरी : ‘मराठी चित्रपटसंवर्धन आणि प्रदर्शनास चालना’ या संकल्पनेतून पिंपरी-चिंचवड महापालिका आणि मराठी चित्रपट असोसिएशन यांच्यातर्फे ‘नाट्यगृहात चित्रपट संकल्पनें’तर्गत मराठी चित्रपट महोत्सव आयोजित केला आहे. सोमवार (२४ मार्च), मंगळवार (२५ मार्च) दोन दिवस चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात चित्रपट दाखविले जाणार आहेत. या महोत्सवाच्या भित्तिपत्रकाचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

क्रीडा व सांस्कृतिक विभागाचे उपायुक्त पंकज पाटील, मराठी चित्रपट असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील, प्रदेश सरचिटणीस कौस्तुभ कुलकर्णी या वेळी उपस्थित होते. महोत्सवामध्ये ‘मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’, ‘इलू इलू’, ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’, ‘चिकी चिकी बुबूमबूम’, ‘श्यामची आई’, ‘संगीत मानापमान’, ‘ हॅशटॅग तदैव लग्नम्’ हे चित्रपट दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटांची निवड विद्यार्थी, तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिक अशा सर्वच स्तरातील प्रेक्षकांचा विचार करून करण्यात आली आहे.

तिकिटाची किंमत नाममात्र

मराठी चित्रपट महोत्सवामध्ये दाखवण्यात येणारे चित्रपट हे नुकतेच प्रदर्शित झाले आहेत. महोत्सवामध्ये या चित्रपटासाठी नाममात्र ५० रुपये तिकीट ठेवण्यात आले आहे. हे तिकीट ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीने खरेदी करता येणार आहे. ऑनलाइन तिकीट खरेदी ticketkhidakee.com या संकेतस्थळावर करता येईल. प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथेही तिकीट विक्री सुरू राहणार आहे. याशिवाय ७८९७८९७२४७ या क्रमांकावर संपर्क करून तिकीट बुक करता येईल.

मराठी भाषेला प्राचीन पंरपरा आणि वारसा आहे. या भाषेचा प्रचार-प्रसार करण्यासाठी मराठी चित्रपटांची भूमिका महत्त्वाची आहे. मराठी चित्रपट महोत्सव हा केवळ मराठी भाषेचा प्रचार-प्रसार करण्यासाठी उपयुक्त ठरणार नाही, तर मराठी चित्रपटाचे संवर्धन होण्यासाठीदेखील महत्त्वाचा ठरेल, असे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी म्हटले आहे.

Story img Loader