पुणे : साहित्यसम्राट आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षाच्या सांगता समारंभानिमित्त ११ ते १३ ऑगस्ट या कालावधीत चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘आत्रेय’ मुंबई, राष्ट्रीय फिल्म संग्रहालय आणि राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ यांच्या वतीने ज्येष्ठ दिग्दर्शक डाॅ. जब्बार पटेल यांना आचार्य अत्रे विशेष पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
हेही वाचा : Raghunath Mashelkar: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार डॉ. रघुनाथ माशेलकर यांना जाहीर
राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे ११ ऑगस्ट रोजी ‘श्यामची आई’ चित्रपटात श्यामची भूमिका केलेले माधव वझे यांच्या हस्ते सकाळी अकरा वाजता महोत्सवाचे उद्घाटन होणार असून, त्यानंतर ‘श्यामची आई’ चित्रपट दाखविण्यात येणार आहे. दुुपारी चार वाजता होणाऱ्या कार्यक्रमात डाॅ. जब्बार पटेल यांना पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात येणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार उपस्थित राहणार असून याच कार्यक्रमात बाबूराव कानडे, विजय कोलते, सुहास बोकील, श्याम भुर्के आणि आप्पा परचुरे यांचा सत्कार करण्यात येणार आहे. आचार्य अत्रेलिखित ‘दलितांचे बाबा’, ‘क्रांतिकारकांचे कुलपुरुष’, शिरीष पैलिखित ‘वडिलांच्या सेवेशी’ यांसह ‘मी अत्रे बोलतोय’ आणि ‘हास्यतुषार’ या पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. त्यानंतर ‘महात्मा फुले’ चित्रपट दाखविण्यात येणार आहे, अशी माहिती आचार्य अत्रे यांचे नातू ॲड. राजेंद्र पै यांनी सोमवारी दिली.