लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : ‘पैसे मिळत नाहीत, असे नाटकवाले नेहमीच म्हणतात. पण, नाटक नेहमी पैशांशिवायच चांगले होत राहील. पैसे मिळाले तर चांगले नाटक होणार नाही. पैसे नसतानाही चांगले नाटक करता येते, हे विद्यार्थ्यांनी सिद्ध केले,’ अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेते, कवी, गायक पीयूष मिश्रा यांनी मंगळवारी फिरोदिया करंडक स्पर्धेतील विजेत्यांचे कौतुक केले. त्याच वेळी, ‘चांगली कथानके मिळत नाहीत म्हणून चित्रपटसृष्टी रडगाणे गात असते. मात्र, चित्रपटसृष्टीला फिरोदिया करंडक स्पर्धेचा ‘क्रॅश कोर्स’ करायला लावले पाहिजे. उत्तम कथानके मिळतील, कमी पैशांत चित्रपट कसा करायचे, हे येथे शिकायला मिळेल,’ असे खडे बोल सुनवायलाही त्यांनी कमी केले नाही.

सामाजिक आर्थिक विकास संस्था, स्वप्नभूमी यांच्यातर्फे आयोजित फिरोदिया करंडक विविध गुणदर्शन स्पर्धेचे पारितोषिक वितरण मिश्रा यांच्या हस्ते गणेश कला क्रीडा केंद्र येथे झाले. त्या वेळी ते बोलत होते. स्पर्धेचे संस्थापक सूर्यकांत कुलकर्णी, अजिंक्य फिरोदिया, एचसीएल फाउंडेशनच्या डॉ. निधी पुंधीर आदी या वेळी उपस्थित होते. कार्यक्रमात गायिका प्रियांका बर्वे, अभिनेता ओम भूतकर यांना गौरविण्यात आले.

मिश्रा म्हणाले, ‘गेली ४५ वर्षे मी नाटक करतो आहे. गेल्या २० वर्षांपासून पैसे मिळवण्यासाठी चित्रपटांत काम करतो. आजवर खूप कष्ट करावे लागले. फारशा सुविधा नसताना विद्यार्थी इतके चांगले सादरीकरण करतात, तर सुविधा मिळाल्यास हे काय करतील? विद्यार्थ्यांचे सादरीकरण पाहून राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे (एनएसडी) दिवस आठवले. एनएसडीच्या विद्यार्थ्यांनाही ही स्पर्धा दाखवली पाहिजे.’

फिरोदिया करंडक ही स्पर्धा खूप खास आहे. या स्पर्धेने खूप काही दिले. या स्पर्धेतून खूप गोष्टी शिकायला मिळाल्याची भावना ओम भूतकर आणि प्रियांका बर्वे यांनी व्यक्त केली. ‘विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणारा हा मंच आहे. स्वतःला, आपल्यातील कलाकाराला शोधण्याची संधी ही स्पर्धा देते. स्पर्धा पुण्याबाहेर नेण्याची मागणी अनेक वर्षांपासून आहे, त्याचाही विचार करायला हवा आहे. मात्र, या स्पर्धेतून अनेकांच्या आयुष्याला काही तरी दिशा मिळाली आहे,’ असे स्पर्धेचे संस्थापक सूर्यकांत कुलकर्णी यांनी सांगितले.

‘विजेते सादरीकरण मुंबईत करा…’

मिश्रा यांनी विद्यार्थ्यांची सादरीकरणे पाहिल्यानंतर भाषणावेळी, ‘विजेते सादरीकरण मुंबईत करा. अनुवाद मी करतो,’ असेही आवर्जून सांगितले. प्रेक्षकांच्या आग्रहास्तव त्यांनी गायलेल्या ‘इक बगल मे चाँद होगा’ आणि ‘आरंभ है प्रचंड’ या गाण्यांना टाळ्यांची भरभरून दाद मिळाली. यंदाच्या स्पर्धेत सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाला प्रथम, एमआयटी ॲकॅडमी ऑफ इंजिनीअरिंगला द्वितीय, तर गरवारे वाणिज्य महाविद्यालय व टिळक महाराष्ट्र विद्यापीठाला विभागून तृतीय पारितोषिक मिळाले.